प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आष्टी: पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीवर दिवाळी ते होळीपर्यंत होणारी विविध विषयावरील नाटकाच्या प्रयोगसंख्येमुळे व रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लोकप्रिय आहे. जनसामान्य कष्टकरी रसिक प्रेक्षकांचे रंजन व प्रबोधन करणारी लोक चळवळ आहे. तीन ते चार महिन्यात हजारो प्रयोग व पन्नास हजारांना रोजगार देणारी सत्तर करोडोची उलाढाल करणारी, सांस्कृतिक अस्मितेचे उत्तम प्रतीक असलेली झाडीपट्टी रंगभूमी इतर देशातील रंगभूमीच्या तुलनेत अग्रेसर आहे.पुणे — मुंबईकडील कलावंतांना आकर्षित करणाऱ्या या रंगभूमीवर स्थानिक कलावंतांनी करियर म्हणून पहात कारकीर्द करावे,असे प्रतिपादन नाट्य कलावंत व अभ्यासक प्रा. डॉ.राजकुमार मुसने यांनी केले. ते कलांकुज रंगभूमी वडसा प्रस्तुत सर्वधर्मसमभाव नाट्य मंडळ आष्टी आयोजित गौतम चांदेकर लिखित खेळ रंगला सौभाग्याचा नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. नाट्यप्रयोगाचे उद्घाटन गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख राकेशजी बेलसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी सरपंच बेबीताई बुरांडे, मुख्याध्यापिका गलबले मॅडम, शहीद वीरपत्नी किरण गोंगले, सामाजिक कार्यकर्ते मंगेशजी पोरटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष बारापात्रे, नाट्य कलावंत विश्वास पुडके, सामाजिक कार्यकर्त्या सत्यफुला डोर्लीकर व अन्य उपस्थित होते. यावेळी झाडीपट्टी रंगभूमीचा सखोल अभ्यास करून सर्वदूर ओळख निर्माण करणारे समीक्षक प्रा.डॉ.राजकुमार मुसणे यांचा मान्यवरांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ज्येष्ठ नाट्य कलावंत विश्वास पुडके यांनी झाडीपट्टी रंगभूमीचे योगदान स्पष्ट करीत स्थानिक कलावंतांनी पुढाकार घेण्याकरिता आवहान केले. मान्यवरांनी स्थानिक नाट्यलेखक गौतम चांदेकर यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य आशिष बावणे यांनी केले. नाट्य प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी मायाताई ठाकूर, पौर्णिमा पुल्लीवार, लीना चांदेकर, हमिदा बिजवे, रजनी झाडे ,मंगलाताई मेडपल्लीवार, सोनू तलांडे, सोनू नागीलवार, लता बोमनवार,गीता मेडपलीवार, रूपा चांदेकर, प्रतिमा सादुलवार, बोरकुटे, कमला अत्राम यांनी परिश्रम घेतले.

