ब्रह्मपुरी येथे सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
एखाद्या पक्षाच्या हाती चिरकाल सत्ता राहील असे कधीच होत नाही. दिवस पालटतील व पुन्हा आम्ही सत्तेत येऊ. सत्तेसाठी जे पक्ष सोडून गेलेत त्यांची आज काय परिस्थिती आहे. म्हणून मी पक्ष सोडणार नाही आपण सर्व मिळून एकजुटीने संघर्ष करू असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी सत्कार मूर्ती म्हणून बोलत होते.
आयोजित सत्कार सोहळ्यास गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ देविदास जगनाडे, सेवादलाचे गुडेवार गुरूजी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जिल्हा बँक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, काॅंग्रेस माजी शहराध्यक्ष विजय तुमाने, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, बाजार समितीच्या उपसभापती सुनीता तिडके, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष वामन मिसार, मज्जावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत काँग्रेसची सत्ता येईल असे वातावरण असताना लाडकी बहीण व महाविकास आघाडीतील काही उनिवा यामुळे पराभव स्वीकारावा लागला. तर सत्ताधाऱ्यांना सत्तेत आल्यानंतरही विश्वास बसेना अशा परिस्थितीमुळे मिळालेले अनपेक्षित यशाच्या मागे शंका कुशंका आजही व्यक्त केल्या जात आहे. आज सर्वत्र महागाई बेरोजगारी यामुळे संपूर्ण राज्य दिवाळखोरीत निघाले असून राज्यात सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड लूट सुरू आहे. माझ्या पक्षांतराचा विषय काहींनी प्रसारमध्यमापर्यंत पोहोचविला मात्र हे पूर्णतः खोटे असून काँग्रेस पक्षाने आजवर मला भरभरून दिले आहे म्हणून मी आजही काँग्रेसचा खरा शिपाई म्हणून कार्य करीत आहे व सदैव करीत राहील. मी वारसाने नाही तर संघर्षातून पुढे आलो व राज्याच्या सत्तेत तसेच विरोधी बाका वरून जनसेवा करू लागलो. आज विरोधी बाकाच्या पहिल्या रांगेत बसून मी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे नाव केले. सत्ता येत जात राहील कुणाचीही सत्ता चिरकाल टिकणार नाही. आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघर्ष करावा आम्हीही मूठभर असतानाही एकजुटीने संघर्ष करीत राहू. असे ते यावेळी म्हणाले. तर विदर्भात काँग्रेसच्या जागा कमी होण्यामागे ब्रह्मपुरीत पार पडलेल्या कुणबी समाज मेळाव्यातील काही सारांशाने काँग्रेस पक्षाला क्षती पोहोचविली असे यावेळी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. पुढे संधी मिळाल्यास आपण लोकसभेसाठी तयारी करणार मी पक्ष सोडून जाणार नाही काळजी करू नका असे भावनिक आव्हानही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. तत्पूर्वी विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार विजय वडेट्टीवार यांचा काँग्रेसच्या तालुका, शहर, युवक काँग्रेस महिला काँग्रेस, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक सेल ,व्यापारी संघटना पत्रकार संघ तसेच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तर नेहरूंवर टीका करून इतिहास दडवू पाहणारे आजचे केंद्रातील सत्ताधारी हे मोहम्मद अली जिनाचे सहकारी होत व त्यांनी देशासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी कुठलेही बलिदान केले नाही तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी तुरुंगवास भोगला. विजय रावांच्या रूपाने मिळालेला आमदाराला माझी पूर्णतः साथ असून ते राज्यात तर मी केंद्रात संघर्ष करून आपणा सर्व कार्यकर्त्यांची आम्ही काळजी घेऊ असे मार्गदर्शनपर बोलताना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर पोपटे प्रास्ताविक काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके तर आभार प्रदर्शन शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
अति महत्वकांक्षी कार्यकर्ते कराड होऊ शकतात…
ब्रह्मपुरीतील तत्कालीन काँग्रेस कार्यकर्ते विलास विखार व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश यावर बोलताना विधिमंडळ नेते आ.विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्व स्वार्थ व अर्थकारण या लोभाने काही कार्यकर्ते वाल्मीक कराड याच्या प्रमाणे वागू लागतात. गोसे खुर्द मध्ये लागणाऱ्या 90 कोटींच्या वाळूसाठी हा भाजप प्रवेश करण्यात आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यापुढे तळ्यात आणि मळ्यात अशी दुहेरी भूमिका वठविणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान राहणार नाही. जो कार्यकर्ता एक निष्ठेने कार्य करेल त्याचाच पक्ष आदर व सन्मान करेल असेही ते यावेळी म्हणाले.

