यशोगाथा

0
341

तळागळातील शिकणारा विद्यार्थी म्हणजेच जिल्हा परिषद शाळेचे असतात. बरेचसे विद्यार्थी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आपले जीवन व्यतीत करत असतात. बऱ्याचशा पालकांचे त्यांच्याकडे विशेष लक्ष नसते. अशा परिस्थितीशी समरस होऊन ते आपलं विद्यार्थी जीवन जगत असतात. अशा अनेक चक्रव्यूहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि शिक्षण अडकलेले असते.अनेक विद्यार्थी अतिशय हुशार ,कुशाग्र आणि शिस्तप्रिय असतात.परंतू घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपल्या जीवनाचे ध्येय गाठता येत नाही.
ग्रामीण भागात व्यसनांचे प्रमाण खूप असते बरेचसे पालक दारूच्या आहारी गेलेले असतात .त्याचं कुटुंबाकडे लक्ष नसते. पत्नी ला मारझोड करणे ,कमावून आणलेले पैसे उडविणे अशा परिस्थितीत आयुष्य जगत असतात. सतत होणारी मारझोड आणि पिळवणूक यामुळे स्त्रिया वैतागून गेल्या असतात . त्यांचं आपल्या पाल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नसते. योग्य वेळी योग्य दिशा मिळाली नाही तर मुलांचा आयुष्य व्यर्थ जात असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आयुष्य फारसं असच आहे.
असाच एक प्रसंग जे मी माझ्या आयुष्यात अगदी जवळून अनुभवलं, ते मी आपल्यासमोर थोडक्यात मांडत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी मक्ता , पंचायत समिती सावली जिल्हा चंद्रपूर येथील इयत्ता पाचवीला शिकणारी कुमारी सुहानी सुधीर मडकाम . तिचं आयुष्य असंच काहीस आहे. तिचे वडील दारूच्या आहारी गेलेले ,कुटुंबाकडे लक्ष नसलेले आईला सतत मानसिक त्रास त्याही परिस्थितीमध्ये ती आपल्या मुलांकडे लक्ष देऊन. त्यांच्या शैक्षणिक बाबी अतिशय काळजीपूर्वक सांभाळून घेत होती अशा प्रकारे सुहानी आपलं शिक्षणाचा गाडा पाचवीपर्यंत घेऊन आली. अत्यंत हुशार असल्यामुळे आणि तिचे पीएसआय चे स्वप्न असल्यामुळे तिला शिक्षणाची पुढील सोय मिळणे आवश्यक होते त्याकरीता तिच्या वर्गशिक्षिका कुमारी वंदना हनवते(सौ. रणदिवे )यांनी अत्यंत छोट्या ,छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन अभ्यास पूर्ण करीत होत्या सुहानी देखील तेवढी जिद्दीने, चिकाटीने परिश्रम करून आपला अभ्यास पूर्ण करीत होती. तिला नवोदय चे ध्येय गाठायचे होते कारण पुढील शिक्षण मोफत, सर्व सोयी – सुविधा युक्त कुटुंबापासून दूर म्हणून नवोदयला निवड होणे अतिशय गरजेचे होते त्यामुळे त्या दोघींचे प्रयत्न सुरू होते.
आणि अशातच तिच्या बाबाच्या सततच्या त्रासामुळे आईने खूप मोठा निर्णय घेतला.
ती आपल्या दोन्ही लेकराला घेऊन माहेरी जायचं ठरवले ही गोष्ट जेव्हा मॅडमला कळली. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आता ह्या मुलीचं काय होणार ,ती तर नवोदय पास होणारच नाही पुढच्या शिक्षणाची तिची वाट धूसर दिसू लागली .तिचे स्वप्न उध्वस्त होतील असे अनेक प्रश्न होते तरी मॅडमनी धीर सोडला नाही. ती तिच्या आईकडे गेली तिला खूप समजावून सांगितलं परंतु आई अगदी मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या हतबल झाली होती .तिला आता पुढील मार्गचं दिसेना असं झालं होतं . त्यामुळे तिने घेतलेला निर्णय आता ती मागे घेणार नव्हती.आणी परत येणार नव्हती. मॅडमला प्रश्न पडला आता करायचं काय? सुहानी बद्दल असलेली काळजी, तिचे स्वप्न क्षणभर तिथेच थांबले आणि मी केलेली धावपळ कुठेतरी कमी पडत आहे. एका मुलीचे आयुष्य मी नाही घडू शकले . असे विचार मॅडमच्या डोक्यात थैमान घालत होते .
त्यांनी मग पक्का निर्णय घेतला . हिला नवोदय ला पात्र करायचे म्हणजे करायचे त्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी चालेल. तेवढ्याच हिमतीने त्या उभ्या झाल्या आणि सुहानी च्या आईला भेटायला गेल्या. तिची भूमिका ठाम होती .त्यामुळे त्यांना काहीच म्हणायचं नाही असे मॅडमनी ठरवले, पण परीक्षेला अवघ्या दोन ,तीन महिन्याचा कालावधी होता आणि सुहानी शाळेतून गेली तर तिचं शिक्षण निश्चितच तिथे थांबणार होता.मॅडमला एक युक्ती सुचली.
प्रश्न दोन-तीनच महिन्याचा आहे पण या दोन-तीन महिन्यासाठी एखाद्या मुलीचा आयुष्य कुठेतरी थांबेल . कुठेतरी तिचे स्वप्न विखुरले जातील तिचं आयुष्य देखील आईसारखं येईल आणि ते व्हायला नको त्यासाठी मॅडमनी ठरवलं की तिला आपल्या घरी न्यायचं.मॅडमच्या घरी राहणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मनावर थोडा दडपण असतो . आईविना आयुष्य काढणं आईला सोडून राहणं ते पण लहान वयात ,ज्या वयात आई-वडिलांची सोबत हवी त्या वयात त्यांना सोडून राहणे यासाठी खूप मोठे धैर्य लागतो. सुहानी कशी बशी तयार झाली. परंतु तिला एकटं अवघडल्यासारखं वाटत होतं. मॅडमनी त्यावर उपाय म्हणून तिच्यासोबतच नवोदय ची तयारी करत असणारी तिची वर्ग मैत्रीण, तिला सोबत न्यायचं ठरवलं ती देखील सुहानी सोबत मॅडमच्या घरी जायला तयार झाली. दोन-तीन महिन्याचा प्रवास त्यांनी मॅडमच्या घरी जाऊन नवोदयचे क्लास करणे, अभ्यास करणे ,लवकर उठणे उशिरा जागणे आलेल्या अडचणी विचारणे, त्या समस्येचे निराकरण करणे अशी ही सुरुवात झाली .बघता बघता हे दोन-तीन महिने निघून जाणार अशी आशा ठेवून त्या मुली मॅडम सोबत अपडाऊन करत होत्या. त्यांचे डाऊट क्लियर मॅडम स्वतः करत होत्या अडचण मोठी असेल तर योग्य मार्गदर्शनाकरीता त्यांना वेगवेगळ्या शाळेत घेऊन जात होत्या . अतिशय प्रयत्नपूर्वक मॅडमनी त्यांचा सराव घेतला. कुठेही मुली कमी पडणार नाही आणि निश्चितच त्या नवोदय ला पात्र ठरतील याची पुरेपूर काळजी घेतली.
आणि तो सोनेरी दिवस निघाला ज्या दिवसाची सुहानी , मॅडम आणि संपूर्ण पेंढरीमक्ताची टीम वाट बघत होते.तो म्हणजेच नवोदयचा रिझल्ट ज्यामध्ये सुहाना नवोदय साठी पात्र ठरली
एखाद्या शिक्षकांमुळे, शिक्षिकेमुळे मुलांचा आयुष्य कसं घडतं याचे जिवंत उदाहरण म्हणजे सुहानी मडकाम आणि हनवते मॅडम
आज आपण बघतो आहोत समाजामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकडे बघण्याची भूमिका बरीचशी वाईटच असते. जिल्हा परिषद शाळेचा मास्तर
अतिशय परिश्रम पूर्वक ग्रामीण भागातील परिस्थितीला जाणून, विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सतत झटणारा असतो. त्याचं ध्येय विद्यार्थीच असतो .सगळ्याच भूमिका त्याला पार पाडावे लागतात. शाळेला चपराशी नसतो ,ना बाबू असतो आणि विविध कामे असतात तरी देखील हिम्मत न हरता सतत विद्यार्थ्यांसाठी झटत असतो.एक दोन काही अपवाद असतील असं म्हणत नाही.पण जास्तीत जास्त शिक्षक, शिक्षिका मेहनतीच असतात. जे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्यांच्या जीवनासाठी सतत कार्यरत असतात. तरीही या समाजाची प्राथमिक शिक्षकांकडे बघण्याची भूमिका कुठेतरी नकारात्मकच दिसते.

सुहानी सारखे कित्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य या जिल्हा परिषद शाळेत घडत असतात त्या मागची कारण त्यांची सद्यस्थितीतील परिस्थिती ग्रामीण भागातील वातावरण पालकांचे दुर्लक्ष घरून न मिळणारे सहकार्य फार कमी पालक असतात चे विद्यार्थ्याकडे लक्ष देतात त्या सर्व परिस्थितीचा जाणीव ठेवून शिक्षक त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देतात .ग्रामीण भागात अठरा विश्व दारिद्र्य असते, व्यसनांचे प्रमाण अधिक असते, हंगामी मजुरी करिता बाहेरगावी जाणे दोन- तीन महिने बाहेर राहणे तेही विद्यार्थ्यांना घेऊन, आई सतत कामात असते ती मानसिक दडपणाखाली असते अशा बऱ्याचशा गोष्टीची जाणीव शिक्षकांना असते.या सर्व बाबींचा निरीक्षण करून ते शिष्यवृत्तीचे ,नवोदयचे विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म भरून देण्यापासून मग ते कुठले का असेना, त्याची जबाबदारी शिक्षकच घेतो आज सुहानीची सगळी जबाबदारी मॅडम पार पाडत आहेत एवढेच नाही तर तिच्या ऍडमिशन पर्यंतची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारलेली आहे त्यांच्या त्या कार्याला माझा मानाचा मुजरा. असे तळागळातील विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या प्रत्येक शिक्षकांसाठी हा लेख प्रेरणादायी राहील अशी सदिच्छा व्यक्त करते.

लता दिवटे गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here