चंद्रपूरात भव्य दोन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन

0
144

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून…

मुंबई येथील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर करणार हृदयविकार व श्रवण तपासणी

गरजू रुग्णांसाठी आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ आणि ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे दिनांक २२ व २३ एप्रिल २०२५ रोजी मोफत हृदयविकार आणि श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र रुग्णांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय शिबिरात विशेषतः मुखदुर्बळ व गरजू कुटुंबांतील १८ वर्षांखालील बालकांची अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. जन्मतः हृदयविकार, गुंतागुंतीचे आजार आणि श्रवण क्षमता कमी असलेल्या मुलांची मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व श्रवणरोग तज्ज्ञांकडून सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास त्यांच्यासाठी पुढील टप्प्यात मुंबई येथे मोफत उपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भारतामध्ये अनेक गरीब व दुर्बल घटकांतील मुलांना वेळेवर निदान व उपचार मिळत नसल्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा शिबिरांच्या माध्यमातून लवकर निदान, तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन आणि मोफत उपचार यामुळे अनेक जीव वाचवले जातात. विशेषतः बालहृदयरोग, जो वेळेत निदान केल्यास पूर्णतः बरा होऊ शकतो, यासाठी अशा शिबिरांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
हृदयरोग व श्रवण अडचणींनी ग्रस्त मुलांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्यावर वेळेत उपचार करून त्यांचे आरोग्य सुधारण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.या शिबिराच्या माध्यमातून तपासणी झाल्यानंतर जर काही मुलांना शस्त्रक्रियेची अथवा विशेष उपचाराची गरज भासली, तर त्यासाठी मुंबईतच मोफत उपचाराची सोयही करण्यात येणार आहे. या शिबिरात तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी डॉक्टर्स आणि समर्पित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतील. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कुठलाही गरीब बालक उपचाराविना राहू नये, ही आमची भावना आहे. असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here