prabodhini news logo
Home ठळक बातम्या मुख्याधिकाऱ्यांवर खंडणी प्रकरणी गंभीर आरोप

मुख्याधिकाऱ्यांवर खंडणी प्रकरणी गंभीर आरोप

0
298

निष्पक्ष चौकशीसाठी तालुका पत्रकार संघ आक्रमक

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – तुमसर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी बीबीजी न्यूज पोर्टलचे पत्रकार गणेशराव बर्वे यांच्यावर खंडणी मागणीचे गंभीर आरोप केल्यानंतर जिल्ह्यात पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून खरे दोषी कोण, हे स्पष्ट करावे, अशी ठाम मागणी तालुका पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक, तुमसर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

११ एप्रिल रोजी ही संपूर्ण घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार बर्वे यांनी एका इसमासह नगरपालिकेत येऊन मुख्याधिकारी यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली आणि बातमी न लिहण्याची धमकी दिल्याचा दावा आहे. मात्र, या घटनेच्या आधारे तयार करण्यात आलेले पोलिस स्टेशनचे पत्र हसारा टोली येथील मोहित मेश्राम नावाच्या युवकाने सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे नवीनच वादंग निर्माण झाले आहे. इतके गोपनीय पत्र सामान्य व्यक्तीकडे कसे पोहोचले, हा प्रश्न गंभीर असून प्रशासनातील माहिती गळतीचाही तपास व्हावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

खंडणीचे आरोप की प्रतिशोधाची कारवाई?

पत्रकार बर्वे हे गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेतील अनियमितता, अपूर्ण विकासकामे, तसेच नागरिकांच्या अडचणींसंदर्भात पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न उपस्थित करत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मते, हेच खुपल्याने मुख्याधिकारी प्यारेवाले यांनी खोटे खंडणीचे आरोप लावत प्रतिशोध घेतल्याचा आरोप केला जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, ११ एप्रिल रोजी बर्वे हे वरठी येथील एका नामांकित खासगी कंपनीत आपल्या नियमित नोकरीवर कार्यरत होते, अशी माहिती पत्रकार संघटनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्या दिवशी ते पालिकेत उपस्थित होते, हाच दावा संघटनेने फेटाळला आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर पूर्वीपासूनच प्रश्नचिन्ह
मुख्याधिकारी प्यारेवाले यांच्याविरोधात याआधीही तक्रारी झाल्या असून, त्यांची कार्यपद्धती ही मनमानी असल्याचा आरोप नागरिकांकडून वेळोवेळी होत आला आहे. राज्यसभा खासदारांनी ३ मार्च रोजी उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून प्यारेवाले यांची कार्यशैली, विकासकामांतील दिरंगाई, तसेच नागरी सेवांबाबत असलेली उदासीनता यावर रोष व्यक्त केला होता.

पत्रकार संघटनांची एकजूट, कारवाईची जोरदार मागणी
या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकवटल्या असून, पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या दबावाच्या आणि खोट्या आरोपांच्या घटना थांबवण्यासाठी दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात प्रा. मोहन भोयर, प्रा. राहुल डोंगरे, अनिल कारेमोरे, सुधीर गोमासे, अमित रंगारी, महेश गायधने, देवचंद टेंभरे, शुभम देशमुख, संजय बडवाईक, तुषार पशिने, नाना ठवकर, काका भोयर, धनंजय बडवाईक, लालू चरडे, संजय नेमाडे, रोहित बोबार्डे, राहुल भुतागे, सुरेंद्र चिंधालोरे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

निष्पक्ष चौकशी आणि माहिती गळतीवर लक्ष देण्याची गरज
पत्रकार संघाने या प्रकरणाची पूर्ण पारदर्शक चौकशी करण्यात यावी, आणि प्रशासनातील गोपनीय माहिती सोशल मीडियावर पोहोचण्यामागचे सूत्रही उघड करावे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here