100 व्या नाट्यसंमेलनात अजब विनोदाची गजब फटाकेबाजी
प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – झाडीपट्टी रंगभूमी ही नाट्यनिष्ठा व रसिकप्रियतेमुळे प्रसिद्ध आहे. सामाजिक, कौटुंबिक, ज्वलंत विषयावरील नाटकांच्या माध्यमातून रंजन व प्रबोधन केले जाते. प्रामुख्याने विनोद हा झाडीपट्टी रंगभूमीचा आत्मा आहे. तीन अंकी झाडीपट्टीतील नाटकात किमान तीन प्रवेश विनोदाचे असतातच अपवाद सदानंद बोरकर यांची नाटके. शंभराव्या नाट्य संमेलनात कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे गुरुदेव रंगभूमी वडसा प्रस्तुत, कैलास शिंगरे निर्मित ,दिलीपकुमार वडे लिखित ,गोपी रंधये दिग्दर्शित,’ माऊली’ नाटकातील प्रवेश जबरदस्त सादर झाला. विनोदी प्रवेशातील ,सन्न पिक अप दन्न अव्हरेजच्या फटाकेबाजीच्या हास्याने सभागृहातील प्रेक्षक दणाणले.
‘ माऊली ‘ हे नाटक कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वैवाहिक बंधनात न अडकता, त्यागी वृत्तीने ,समर्पित भावनेने केलेल्या बहिणीच्या कर्तुत्वाची गाथा दर्शविणारे आहे.तरुण मुलींना या काळात सांभाळणे कठीण कार्य. त्यातही दोन चंचल तरुण मुलीचा बाप असेल तर तर त्याची झोप कशी उडते आणि कोणत्या अवस्थेतून मार्गक्रमण करावे लागते, कुटुंबवत्सल बापाची चिंता, काळजी, मंदिरापेक्षाही मुलींच्या घरासमोर वाढणारी टापरटांची गर्दी, आसुसलेल्या नजरा, सौंदर्यवती मुलींमुळे उद्भवणाऱ्या समस्या ,त्यांना तोंड देताना होणारी बापाची चिडचिड, धावपळ, त्रेधा, मुलींवर लादणारी बंधने , स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणाऱ्या बाबांना दिशाभूल करणाऱ्या मुली, होणारी गळचेपी आणि त्यातूनहोणारी विनोद निर्मिती , अस्सल झाडीतील विनोदी फटाकेबाजीने प्रेक्षागृहातील रसिकांना प्रचंड हसविले.
सौंदर्यवती रेखा आणि रंभा या दोन्ही तरुण मुलीचे काळजीवाहू वडील बाजीराव विनोदवीर कल्लू शिंगरे, प्रेमाच्या साफल्यासाठी प्रयत्नरत चतुर ट्रक ड्रायव्हर नाऱ्या गोपी रंधये ड्रायव्हरची रांगडी भाषा, नाऱ्याच्या प्रेमासाठी आसुसलेली बिनधास्त रंभा नाऱ्याची प्रियशी दीपाली भरडे, शिक्षण घेऊन करिअरला प्राधान्य देणारी आणि ऑफिसमध्ये नोकरी करणारी व बॉसची मर्जी राखणारी फॅशनेबल सेक्रेटरी रेखा तेजस्विनी खोब्रागडे या चौघाच्या क्रिया- प्रतिक्रियांच्या जोरदार फटाकेबाजीच्या संवादातून हास्याची फवारे उडतात.
दोन्ही मुलींच्या बिनधास्त वृत्तीने त्रासलेल्या बापाची चिडचिड होते . मुलींच्या वर्तनावर बाप बंधने लावतो परंतु हुशारीने मुली बरोबर त्यातून मार्ग काढत वडिलांना आपलेच म्हणणे पटवून देतात.
ट्रक ड्रायव्हर नाऱ्यासोबत बाहेर कुठे फिरायला जायचे नाही अशी तंबी दिल्यानंतरही रंभा मुलगी लपून-छपून नाऱ्या सोबत ट्रकवर फिरायला जाणे व वडीलाचे न ऐकणे. वारंवार सांगूनही तोकडे फॅशनेबल कपडे परिधान करणारी रेखा आपले कमी साईजचे कपडे किती व्यवस्थित आहेत , ही फॅशन असल्याचे पटवून देण्याचा विपरीत प्रयत्न करते. शिवाय ऑफिसमधल्या बॉसला खुश करावेच लागते, बुद्धी चातुर्याने पटवून देते.त्यावेळी मुलींच्या अजब वर्तनामुळे हतबल झालेला बाजीराव ” मानवाने कपड्याची निर्मिती केली ती नग्न शरीर झाकण्यासाठी. स्त्री-पुरुषाचे अंग झाकून कपड्याने मानवावर केवढे उपकार केले ,असे मी पूर्वी समजत होतो. पण आज तुमची ही छोटी छोटी वस्त्र पाहिली की असं वाटते, तुम्हीच त्या कपड्यावर उपकार करीत आहात.. “अशाप्रकारे बदलत चाललेल्या फॅशनवर विनोदातून भाष्य करीत प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
माऊली या नाटकातील प्रसंगनिष्ठ विनोद हास्याचे फवारे उडविणारा आहे. सन्न पिकअप दन्न अव्हरेज, सेल्फ , हल्ला, अणुबॉम्ब, ताप ,येलपाडे , स्पोर्ट, अंडरग्राउंड एमपी- माणूस पारखी, रिझर्वेशन, पार्टी बदलवणे , पाठिंबा,आऊट ऑफ कव्हरेज, वेटिंग, भजन या द्विअर्थी शब्दोच्चाराने हास्यास्पदता निर्माण होते.शिवाय मोटार चालकांच्या ड्रायव्हर क्षेत्रातील एकच मालकाच्या दोन गाड्या, चेसिस बेंड, इंजिन गरम ,मीटर, गाडी सर्विसिंग ,बॅटरी, धक्का ,ऑइल पाणी, स्पीड, रिव्हर्स घेर , स्पीड ब्रेकर, मोसम, सेल्फ या द्विअर्थी शब्दोच्चाराने विनोद निर्माण केला जातो.
घरात राहून बाहेर उजेड पाडणे ,एका जन्मात सात नवरे करणारी मेनका, आवं तू जा ना वं, अशा विलक्षण संवादाने विनोद निर्मिती होते. एकूणच झाडीपट्टी नाटकातील पारंपरिक ढाचातील पात्र व प्रसंग यातील नाविन्यतेने विनोदाचे बदलते स्वरूप माऊली हे नाटक गडदपणे दर्शविते. शिवाय तरुण मुलींना सांभाळणाऱ्या काळजीवाहू वडिलांची आंतरिक वेदना व दुःख मार्मिकपणे स्पष्ट करते.
तद्वतच बदलत्या काळातही मुलींनी अंगभर कपडे परिधान करून सात्विकवृर्तीचा अंगीकार करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
वयात आलेल्या तरूण पोरी म्हणजे विषयाची पुडी, दोन मुली म्हणजेच अणुबॉम्ब अशा मुलीच्या संगोपन व इज्जतीसाठी बाजीरावची विलक्षण काळजी, ड्रायव्हर नाऱ्याचा अनोखा वेष व रांगडी डायलॉगबाजी, प्रेमासाठी आतुर वायु वेगाने झेपावणारी पेट्रोल टॅंक रंभाचा बिनधास्तपणा , येलपाडी, लाडिक,चंचलललना रेखाच्या फॅशनेबलपणा, सर्व कलावंताचा कसदार अभिनय, गतिमानता व कल्लू शिंगरे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकीने रंगतदार झालेल्या नाट्यप्रयोगाचा मस्त हसत प्रेक्षकांनी मनमुरादपणे आस्वाद घेतला.
प्रा. राजकुमार मुसणे

