गंध मातीचा सुटला
मन मोहरून गेले
आज माझ्या मनामध्ये
सुख चांदणे फुलले।। १।।
होता स्पर्श पावसाचा
धरा गंधाळून गेली
ध्यानी मनी स्वप्नी माझ्या
ओढ साजन लागली।।२।।
पसरले थेंब छान
वाटे मोत्याची ती माळ
अलगद बांधीयले
पायी घुंगराची चाळ।।३।।
मृदगंध झाले धुंद
मनी प्रसन्न दिसले
येता पावसाचा थेंब
गाली हळूच हसले।।४।।
रूप पाहून आपले
लाज गालावर आली
नभ झुकलेले खाली
ओठी धरेच्या गं लाली।।५।।
चरा चरात भरतो
तोच मातीचा सुगंध
पडे थेंब पावसाचा
झाली अवनी बेधुंद।।६।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

