
रंगीबिरंगी सातरंगी मनमोहक असे हे फुलपाखरू किती दिवसाचे आयुष्य असेल त्याचे? फक्त चौदा दिवसाचे आयुष्य असते. या फुलावरून त्या फुलावर उडणारे असे मनमोहक पाखरू निसर्गाची सुंदर कलाकृती आहे. माझ्या घराच्या बाजूला हल्ली पावसाळ्यात खूप तर्हेची रानटी झाडे आणि त्यावरील रानटी रंगीत फुले बघायला मिळतात. या फुलांवर बागडणारी तर्हेची सुंदर मोहक फुलपाखरे खूपच छान दिसतात.
या फुलपाखरांच्या खूप जाती प्रजाती आहेत. मोनार्क जातीचे फुलपाखरू लांब प्रवास करू शकते तर बिबळ्या, कडवा या जातीच्या फुलपाखराची मादी रूईच्या पानावर अंडी घालते. फुलपाखरांच्या जवळपास २२५ प्रजाती आहेत.
दोन वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचले, ते आत्मचरित्र होते एक सरकारी अधिकारी त्यांचा छंद फुलपाखरांवर अभ्यास करणे. फुलपाखरांचे वेगवेगळे प्रकार ही त्यांना ओळखता येतात. या फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी ते अरुणाचल प्रदेश मध्ये गेले. तेथे गेल्यावर त्यांना खूप वेगवेगळ्या फुलपाखरांचा अभ्यास करता आला . त्या आनंदात असताना एक दिवस अचानक तेथील नक्षलवादी- आतंकवादीनी त्यांना पोलीस गुप्तचर समजून पकडले आणि जवळजवळ तीन महिने हे अधिकारी या आतंकवाद्यांच्या तावडीत होते तेथे असताना खूप छोटी मुले आतंकवादी कशी बनतात, त्यांचे हेलावून टाकणारे अनुभव, त्यांची मानसिकता लेखकाने पुस्तकात दिली आहे.
अरुणाचल प्रदेश हा दाट झाडा झुडपांचा प्रदेश, असा जंगलांमधून ते आतंकवादी या अधिकाऱ्याला घेऊन जात असताना त्या परिस्थितीतही त्यांना छान फुलपाखरू दिसत होते. हा सर्व अनुभव ज्यांनी दिला त्यांचे नाव डॉक्टर विलास बेडेकर आणि त्यांचे पुस्तकाचे नाव पोखिला अपहरणाचे ८१ दिवस आवर्जून वाचावे असे हे पुस्तक खूप छान आहे. वरील फुलपाखरांची माहिती त्याच पुस्तकातली आहे.
लेखिका रेखा डायस
गोवा















