prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – गुरुपौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – गुरुपौर्णिमा

0
236

प्रथम ज्यांनी आपल्याला घडवलं, जीवनात जगायला शिकवलं, लढायला शिकवलं असे प्रथम आपले गुरू म्हणजे आपले आई वडील. आई वडील आयुष्याला आकार देतात. त्यामुळे पुढील प्रवास शक्य होतो. तसेच शिक्षक, मार्गदर्शक, सुद्धा आपले गुरू असतात. गुरु लहान किंवा मोठा हे महत्त्वाचे नाही. प्रत्येकाकडून नकळत काही शिकता येते.
आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा आहे. या जगात अनेक गुरु होऊन गेले. भारत देश साधु, संत, ऋषीमुनींचा देश आहे. गुरुच महत्व मानवी जीवनात फार महत्वाच आहे. गुरुचा साधा सोपा अर्थ संतांनी सांगितला तो असा अंधःकारातून उजेडाकडे नेणारा, सत्याचा मार्ग दाखविणारा, तसेच संतांच्या जगण्यातून सत्याचा खरा विचार समजतो. पण आज समाजात गुरुचे पेवच फुटले आहे. गुरु करा तुम्हाला मोक्ष मिळेल. गुरुची आज्ञा पाळा. गुरुला कुठलाही प्रश्न विचारू नका. त्यांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द ब्रम्ह वाक्य असते. सर्वच धर्मातील मानव समाज हा ‘गुरु’ या शब्दानेच संभ्रमित आहे. प्रसारमाध्यमात दिसणारे साधु-संन्यासी स्वतःला गुरू म्हणून प्रचार करतात. मोठा लोकसमुह त्यांना गुरूस्थानी मानतो. जगातल्या सर्वांनीच, संत महापुरूषांनी कोणाला तरी गुरुस्थानी मानले आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात तीन महामानवांना गुरुस्थांनी मानले.
भगवान गौतम बुध्द, संत कबीर आणि महात्मा ज्योतीबा फुले, या तीनही महामानवांना त्यांनी कधी पाहिले नाही. त्यांच्या विचारांना गुरू मानले. हे संत महापुरूष व्यक्तीपुजक नव्हते ते विचारपूजक होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले होत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले गुरू आणि हे महापुरूष आपल्या गुरूचे गुरु. अशी ही गुरु परंपरा आहे. या गुरु शिष्याच्या जोड्या आहेत. इतरही गुरु शिष्याच्या जोड्या आहेत जसे, शिवाजी महाराज- जिजाबाई व संत तुकाराम महाराज, स्वामी विवेकानंद – रामकृष्ण परमहंस, इत्यादी.
भगवान बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांनी सात आठवडे पिंपळवृक्षाखाली घालविली. पिंपळवृक्षाला बोधिवृक्ष म्हणतात. ज्ञान प्राप्तीमुळे भगवान बुध्दांनी बोधिवृक्षाची कृतज्ञता व्यक्त केली, त्यामुळे बोधिवृक्ष सुद्धा त्यांचा गुरू झाला. पिंपळवृक्ष तीनही ऋतूत ठामपणे एका जागेवर उभा राहून ऊन वारा पावसाशी संघर्ष करतो. दिवसरात्र दुसऱ्याला प्राणवायू देतो. म्हणून तो वृक्ष गुरूच्या स्थानी आहे. कमळाचे फूल, काटेरी कुंपणावरील फुल हे जीवन कसे जगावे याचे शिक्षण देतात. नदीचा उगम तीचा प्रवाह आणि समुद्राला जाऊन मिळणे फार खडतर प्रवास असतो. नदी ही कधी विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. ती आपला मार्ग शोधते. म्हणजे ती मार्गदाता आहे. डोंगर दऱ्या सुद्धा गुरूच्या स्थानी आहेत. शिवाजी महाराजांचे स्वराज्य डोंगर दऱ्याच्या आश्रयाने उभे राहिले. बळीराजाला सुद्धा गुरू म्हणता येईल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ग्रंथांना गुरु मानले होते. गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. मनुष्य लहानपणा पासुन म्हातारपणा पर्यंत शिकतच असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजीवन विद्यार्थी होते. त्यांना 9 भाषा येत होत्या व त्यांच्या कडे 32 डिग्र्या, 64 विषयात होत्या. कोणताही त्रास न देणारे गुरु म्हणजे ग्रंथ होय. यात सर्वच प्रकारचे ज्ञान उपलब्ध असते. ग्रंथांना वेळ, काळ, धर्माचे बंधन नाही. म्हणून ग्रंथ हे सुद्धा आपले गुरु आहेत.
बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेचे महत्व
आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हा एक बौद्ध सण आहे. ही पौर्णिमा साधारणत: जुलै महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमे नंतर येते, संबोधी प्राप्ती नंतर भगवान बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेश सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच परिव्राजकांना दिला होता. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधले जाते आणि पाच भिख्खूंना पंचवर्गीय भिख्खूं म्हणून ओळखले जाते. आषाढ़ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिख्खूंना धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे.
वर्षावास
भगवान बुध्दांनी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मदिक्षा सारनाथ येथील इसिपतनच्या मृगदायवनात दिली, तो कालावधी पावसाळ्याचा होता. तथागतांनी साजरा केलेला वर्षावास, तथागतांचा व बुध्दधम्माचा प्रथम वर्षावास म्हणून संबोधिला जातो. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते आणि त्यांची सांगता अश्विन पौर्णिमेला होते. भगवान बुद्धांनी त्या पाच परीव्राजकांना आपला प्रथम धम्म उपदेश दिला व धम्मचक्र फिरविले तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा. पाच परिव्राजक भगवान बुद्धांचे प्रथम अनुयायी झाले. आणि पुढे साठ भिक्खूंचा संघ निर्माण करून संघांची स्थापना केली. निसर्गाचे निरीक्षण करून, उन वारा, पाऊस यापासून भिक्खूंना त्रास होऊ नये यासाठी वर्षावासाची सुरुवात केली. ‘वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास’ या वर्षावास काळात भिक्खूंनी एका ठिकाणी विहारात राहून बौद्ध उपासक उपासिकांना धम्म उपदेश करावा असा आदेश तथागतांनी भिक्खूंना दिला होता.
जगात फक्त प्रथम एकच गुरु होऊन गेले ते म्हणजे जगदवंदनीय जगदगुरू तथागत भगवान बुद्ध होय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्ती प्रमाणे तथागत जे बोलले त्यांनी तसे केले म्हणून ते तथागत आहेत. भगवान म्हणजे ज्यांनी सर्व तृष्णांचा त्याग केला ते भगवान बुद्ध होय. मनुष्याकरिता आणखी एक महत्त्वाचा गुरू असतो तो म्हणजे निसर्ग. आपण सर्वांना आपल्या या सर्व गुरूंचा सन्मान केला पाहिजे. कारण निसर्ग सर्व प्राणी मात्राचा समतोल राखतो.
आषाढ़ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिन
आषाढ़ पौर्णिमेला बौद्ध लोकांमध्ये ऐतिहासिक महत्व आहे. इ. स. 528 पूर्व 35 व्या वर्षी तथागत भगवान बुद्धाला बौद्धगया येथे बुद्धत्वाची प्राप्ती झाली. महाकारुणिक सम्यक संबुद्धाने बौद्धगया येथे बुद्धत्व प्राप्त केल्या नंतर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सारनाथ येथे पञ्चवर्गीय भिक्खूना आपला प्रथम ऐतिहासिक धम्म उपदेश दिला. या उपदेश नंतर भगवान बुद्धांनी प्राणिमात्राच्या कल्याणासाठी ‘धम्माचे चक्र’ फिरवून भिक्खुसंघाची स्थापना केली. बौद्ध देशात आषाढ़ पौर्णिमेला ‘धम्मचक्कप्पवत्तन दिवस’ बौद्ध धम्माचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी बौद्ध धम्माची स्थापना झाली.
आषाढ़ पौर्णिमेचे बौद्ध धम्मात ऐतिहासिक महत्व आहे. आषाढी पौर्णिमेला भगवान बुध्दांनी सारनाथ येथे पंच्चवर्गीय भिक्कुना आपला प्रथम धम्म- उपदेश दिला. या उपदेशाला बौद्ध साहित्या मध्ये ‘धम्मचक्कप्पवत्तन सुत्त’ नावाने जाणले जाते. आषाढ़ी पूर्णिमेच्या दिवसा पासून भिक्खूंचा ‘वर्षावास’ सुरू होतो. पावसाळ्यात आषाढ़ पूर्णिमा ते आश्विन पूर्णिमा म्हणजे तीन महिन्यांपर्यंत बौद्ध भिक्खुना विहारात वास करण्याला आम्ही वर्षावास म्हणतो. वर्षावास करण्याची परंपरा स्वतः भगवान बुद्धांनी सुरू केली. जी आजही निरन्तर चालु आहे. हे काम भिक्खुचे विनय बनले आहे. आषाढ पौर्णिमेला जगातील बौद्ध भिक्खू तीन हिने पर्यंत एकाच स्थानी राहण्याचा संकल्प करतात.
“आषाढ पौर्णिमेला खालील घटना प्रमुख मानल्या जातात”.
आजच्या दिवशी सिद्धार्थ गौतम माता महामायाला गर्भ धारणा झाली.
आजच्या दिवशी सिद्धार्थ गौतमने लोक कल्याणासाठी गृहत्याग केला.
आजच्या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथच्या पावन भूमिवर पंच्चवर्गीय भिक्खुना ‘धम्मचक्कप्पवत्तन सुत्त’ चा उपदेश दिला.
आजच्या दिवशी भगवान बुद्धांना पंच्चवर्गीय भिक्कुनी तथागतना आपले गुरू मानले. म्हणून आजच्या आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात.
बहुजनांनी जातीजातीत, देवा देवात, कर्मकांडात वाऱ्यात, दिडिंत, हरी नामात, कधिच न परवडणाऱ्या शेतीत अटकु नये. जागरण, गोंधळ, सत्यनारायणाची पुजा, देवाला नवस, करु नये. मनुवादी षडयंत्रामुळे भारतातुन बौद्ध धम्म नष्ट झाला होता. आषाढ पौर्णिमेची परंपरा बुद्ध काळापासुन अखंडपणे सुरु आहे. आषाढ पौणि॔मेच्या म्हणजेच गुरु पौणि॔मेच्या आपणा सर्वांना हार्दिक सुभेच्छा.
सर्वांचे मंगलं होवो

लेखक प्रा. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here