
या एकविसाव्या शतकात सर्व बदललेल आहे. इमारतींची उंची वाढलेली आहे पण माणुसकीची उंची फार खालच्या पातळाला गेलेली दिसते.
या स्मार्टफोनमुळे लगेच सर्व जरी कळते तरी ह्या स्मार्टफोनचा उपयोग कोण कसा करेल काही सांगता येत नाही. समोर एक्सीडेंट झालेला असेल तर काही लोक त्याचे शूटिंग काढतात तर काही त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ काय तर माणुसकी लोप पावत चाललेली आहे. काहिंना सोशल मीडियावर फेमस व्हायला आवडते. तर काही त्याचा वापर करायला नको म्हणतात. सोशल मीडिया सगळेच काही वाईट नाही त्यामुळे बरेचसे अंदाज लावले जाऊ शकतात. चांगले, वाईट समजले जाते. म्हणून असे म्हणावेसे वाटते की माणुसकीची उंची कमी झाली आहे आणि इमारतींची उंची मात्र भरपूर वाढली आहे कारण इमारती जागोजागी हल्ली २५, ३० मजली बघायला मिळतात पण माणुसकी बघायला मिळत नाही.
रस्ते चौपदरी, सहा पदरी असे रुंद झालेले आहेत. माणसाची दृष्टी मात्र अरुंद झालेली आहे.
माणसाच्या दृष्टीला चांगले दिसतच नाही. वाईट लगेच दिसते आणि त्याची अंमलबजावणी केली जाते.
अगदी टीव्हीवर सिनेमामध्ये ज्या वाईट घटना दाखवतात त्या करू नयेत असा त्याचा अर्थ असतो परंतु माणूस याचा अर्थ वेगळा काढतो आणि त्याच कृतीनुसार माणूस कृती करतो. वाईट कृतिच्या सागरात एक व्हायला लागतो.
मोठी झाली पण कुटुंब व्यवस्था छोटी झाली. पूर्वी घरामध्ये आजी,आजोबा, काका, काकू, सर्व भावंडे एकत्र राहत होते. गुण्या गोविंदाने नांदत होते. कमवलेला पैसा पुरत होता.राहणीमान साधे होते. गरजा कमी होत्या. कोणाचे जास्त लाड होत नव्हते.
हल्ली मात्र आजी, आजोबा वृद्धाश्रमात, काका,काकू वेगळ्या घरात, भावंडांची ताटातूट असे दृश्य ठीक ठिकाणी म्हणजे साधारण ६०-७० % घरांमध्ये दिसतेस दिसते. प्रत्येक घरातच असे दृष्य असेल असं नाही. पण पूर्वी एकत्र पद्धती होती त्याच्यामुळे मुलांवर उत्तम संस्कार होते ते एकोप्याचे संस्कार होत होते. हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जरा मुलांमध्ये संस्कार सुद्धा कमी व्हायला लागलेत. एकुलता एक मुलगा किंवा दोन मुलं. त्यामुळे त्यांचे अती लाड केले जातात. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो. ज्याच्या त्याच्या परिणाम होतो तो आपल्या मुलांचे लाड करतच असतो. त्यामुळे काही मुले बिघडले जाऊ शकतात. कोणाचे ऐकेनासे होतात.
अती लाडाने मूल वेडे होते त्या प्रमाणे…
पूर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या,हल्ली खूप गरजा वाढलेल्या आहेत. त्यामुळे शिल्लक कमी झाली आहे. खर्च वाढला आहे.
त्याचा ताळमेळ राखताना नाकी नऊ येतात. त्यातच माणसांचे सुख सोयी खूप मिळत आहेत. पण त्यांना ते अनुभवायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. म्हणजेच काय तर सुखसोई पुष्कळ पण वेळ दुर्मिळ झालाय.
अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्या जीवनात घडत आहेत. जसे की पदव्या स्वस्त झाल्यात पण शहाणपण महाग झाले माहितीचे डोंगर सजले जात आहेत पण नेमकेपणाचे झरे मात्र वाटले आहेत… अशी बरीचशी उदाहरणे आपल्याला दैनंदिन जीवनातील देता येतील.
मालकाची भाषा शैली वाढली पण मूल्य संस्कार कमी झाले. घरामध्ये दररोज पाच पाच सहा सहा गोळ्या घेऊन जगणारी माणसं आहेत भरपूर पैसा आहे पण आरोग्य कमी झालेल आहे.
आरोग्य ही आपली संपत्ती आहे हल्ली हे माणसाला समजतंय पण त्या आरोग्यासाठी विविध व्यायाम प्रकार करणं, चौरस आहार घेणं,यासाठीच माणसाकडे वेळ लागेल त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत जातात आणि औषधांचा मात्र भरपूर वापर केला जातो.
व्हाट्सअप, इंस्टाग्राम,फेसबुक या माध्यमातून आपण अनेक लोकांशी विविध संवाद साधतो, परंतु मायेचे चार शब्द आई, वडील,मुले यांच्याशी बोलू शकत नाही. आपल्याच घरातल्या माणसांशी संवाद लोप पावलेला दिसतो. बघा जर संध्याकाळी सगळे एकत्र घरामध्ये सापडले तर, अगदी दोन वर्षाच्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि तो मोबाईल मध्ये काहीतरी पहात असतो काहीतरी कोणालातरी मेसेज द्वारे सांगत असतो,बोलत असतो. असंच दृश्य हल्ली दिसते.
भले मनुष्य चंद्रावर पोहोचलाय परंतु शेजारच्या नव्या आलेल्या माणसाला , शेजाऱ्याला भेटायलाही त्याला वेळ होत नाह. साधीविचारपूस जमत नाही. बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललेलो आहोत पण आपल्या आतल्या माणसातल्या अंतर्मनाचा हरण्याचं काय?
तर मानवा माझ्यासहित तू पण स्वतंत्र विचाराचा बन,पण स्वातंत्र्याचा स्वैराचार मात्र नको.
मुक्त जगावे परंतु मुक्त जगताना सर्वांचा विचार करून जगावे. जीवन आपलेच आहे. त्या जीवनातील जगण्याचा आनंद घ्यावा. समाजातील बांधिलकीचा मान ठेवा. समाजाचे नियम पाळा. समाजात राहून एकट्याचाच बिलकुल विचार करू नका. सर्वांना बरोबर घेऊन चला. एकमेकांचे हात धरून सर्वांना सुखी ठेवण्याचे वचन घेऊया.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा – पुणे















