prabodhini news logo
Home ठळक बातम्या चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

0
80

वंचित बहुजन आघाडी आक्रमक

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मुंबईतील चेंबूर परिसरात रहेजा बिल्डरने आपल्याच बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कागदपत्रे व्यवस्थित स्टेपल न केल्याच्या शुल्क कारणावरून बिल्डर सुशील रहेजाने राहुल जाधव या तरुणाला मारहाण करत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात रहेजा यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजा याच्याकडे कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी कागदपत्रे (पेपर) नीट स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा यांनी राहुलला मारहाण केली. केवळ इतक्यावरच न थांबता, “तुम घाटी जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही” असे वादग्रस्त आणि जातीवाचक शब्द वापरून त्याचा अपमान केला व स्टाफ समोरच मारहाण केली.

वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका –

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे माजी चेंबूर तालुका अध्यक्ष हरीश काशीद यांनी पीडित राहुल जाधव याला सोबत घेऊन थेट डीसीपी समीर शेख यांचे कार्यालय गाठले. काशीद यांनी या अन्यायाविरुद्ध दाद मागत बिल्डरवर कडक कारवाईची मागणी केली. डीसीपी समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गोवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

गुन्हा दाखल आणि अटकेची मागणी –

गोवंडी पोलिसांनी हरीश काशीद आणि पीडित राहुल जाधव यांची जबानी नोंदवून घेतली असून, बिल्डर सुशील रहेजा याच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुंबईत मराठी-अमराठी वादाचे वातावरण तापलेले असताना, अशा प्रकारे मराठी तरुणाला जातीवरून लक्ष्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

बिल्डर सुशील रहेजा याला तात्काळ अटक करण्यात यावी. कायद्याचे राज्य आहे, अशा प्रवृत्तींना धडा शिकवलाच पाहिजे. जर पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हरीश काशीद यांनी दिला आहे. पीडित तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक स्तरावरून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here