prabodhini news logo
Home चंद्रपूर अजितदादा कायम स्मरणात राहतील – आ. किशोर जोरगेवार

अजितदादा कायम स्मरणात राहतील – आ. किशोर जोरगेवार

0
103

अजितदादांच्या स्मृतींना चंद्रपुरात भावपूर्ण अभिवादन

उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – राज्याचे दिवंगत लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अस्थीकलश चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आज अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अजितदादा कायम स्मरणात राहतील अश्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजीव कक्कड, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, घुग्घुस नगर परिषदेचे नगरसेवक आशिष मासिरकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष चारुशिला बारसागडे, कार्याध्यक्ष हेमांगिनी बिश्वास, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, प्रतिमा ठाकूर तसेच भरत गुप्ता आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा आज आपल्यात नाहीत, हे वास्तव स्वीकारणे अत्यंत कठीण आहे. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे स्पष्टवक्तेपणा, ठाम निर्णयक्षमता, प्रशासकीय अनुभव आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ ही अजितदादांची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
अजितदादांचे कार्य अत्यंत व्यापक व दूरदृष्टीपूर्ण होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ सत्तेपुरते मर्यादित न राहता लोकाभिमुख, विकासकेंद्रित आणि निर्णयक्षम राजकारणाचा वेगळा आयाम निर्माण केला. प्रशासनावर असलेली पकड, कामातील शिस्त, स्पष्ट भूमिका आणि ठामपणा ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होती, अशा भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते घडले आणि त्यांनी जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय व राबवलेली धोरणे आजही मार्गदर्शक ठरत असून त्यांनी केलेले भरीव कार्य महाराष्ट्राच्या राजकारणात कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजितदादा पवार यांचे योगदान अजरामर असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here