prabodhini news logo
Home चंद्रपूर कबड्डीमुळे ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नवी दिशा : सोनाली भास्कर कावळे (बांगडे)

कबड्डीमुळे ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नवी दिशा : सोनाली भास्कर कावळे (बांगडे)

0
107

इटोली येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य पुरुषांच्या ग्रामीण कबड्डी स्पर्धेचा जल्लोषात समारोप;
ग्रामीण खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर कबड्डीसारख्या पारंपरिक खेळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळत असून, अशा स्पर्धांमुळे ग्रामीण खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सोनाली भास्कर कावळे (बांगडे) यांनी केले. त्या जय बजरंग क्रीडा मंडळ, इटोली यांच्या वतीने आयोजित भव्य पुरुषांच्या ग्रामीण कबड्डी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बोलत होत्या.
इटोली (ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) येथील ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणावर आयोजित या स्पर्धेचा मोठ्या उत्साहात व जल्लोषात समारोप झाला. स्पर्धेदरम्यान संपूर्ण परिसरात क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी उसळली होती.
या स्पर्धेत (ब) गट, ५५ किलो वजनगटांतर्गत ग्रामीण भागातील नामांकित कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला. सामन्यांदरम्यान खेळाडूंनी चपळता, ताकद, डावपेच आणि संघभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अंतिम दिवशी झालेल्या अटीतटीच्या सामन्यांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विजेत्या, उपविजेत्या तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व चषक प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला बल्लारपूर काँग्रेस कमिटीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष गोविंद उपरे, सरपंच तुलसीदास पिपरे, युवक तालुका अध्यक्ष नरेश बुरांडे, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर कावळे, बल्लारपूर काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्ष सौ. नाजुका हनुमान आलाम, शेखर आलम, सूर्यकांत दयालवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.
या यशस्वी स्पर्धेच्या आयोजनासाठी जय बजरंग क्रीडा मंडळ, इटोलीच्या आयोजक समितीने अध्यक्ष मोहन तायवार, उपाध्यक्ष शंकर दयालवार, अक्षय दुग्धळे, सचिव सचिन वैरागडे, सहसचिव गणपत सिडाम, कोषाध्यक्ष आशिष बारसागडे, सहकोषाध्यक्ष राकेश पिपरे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य व स्वयंसेवकांनी स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले.
या कबड्डी स्पर्धेमुळे इटोली व परिसरात क्रीडा चैतन्य निर्माण झाले असून, भविष्यातही असे क्रीडाविषयक उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थ व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here