
मंगलमूर्ती प्रेमळ माते आई
तुझ्यात सारे देवी-देवता सामावलेत आई
तुझे सात्विक, साधे, भोळे रूप
अजून तरळते नजरेत
तुझ्या संस्कारांनी शिकवला
अर्थ जीवनाचा आई,
तुझे ममतेचे वागणे-बोलणे
अजूनही गुंजते कानात
शुद्ध विचार निरागस वागणे
तूच शिकविले बालपणात
तुझ्याच अपार मायेने
दिला अखंड आधार आई,
तेव्हाचे सात्विक जीवन
कुठेतरी लपले आज
शेजारी मौलिक संबंध
शोधून ही न मिळती आज
परस्परांचे स्नेहबंधन आहेत का कुठे आज?
तो काळ नजरेतून निसटता भवतीचे जग अदृश्य होई,
तुझ्या जात्यावरच्या ओव्या,
आजही स्मरतीग मजला,
अजानाचा पाला तुकारामाच्या गायीला,
सोनियाचा गरूड खांब जनाबाईच्या रवीला
ही भावनास्पर्शी ओवी हळुवारपणे तू गाई,
आकाशातील तारे मोजणे
गोष्टी ऐकण्यात रमणे
अंगण अपुले असे भरलेले
सान-थोरांनी असे सजलेले
परस्परांची जवळीक आता कुठे दिसते, आई?
अजून मागे वळून पाहता
नयनामधून अश्रू ओघळती
ते प्रेमळ नाते सहज वागणे
लपले काळाच्या पडद्यात
तू दिलेल्या श्रद्धा-भावनावर
आजमी जगते आई..
हे माझे प्रेमळ आई..
हे मंगलमूर्ती आई..
निर्मला ज्ञानेश्वर बोरकर
नागपूर
















