
स्वप्निल रा. मोहितकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
भद्रावती – भद्रावती शहरातील भद्रनाग मंदिर ते विजासन बुद्ध लेणी या रस्त्याचे नव्याने कॉंक्रिटीकरण करून नवीन रस्ता बनविल्यामुळे हा रस्ता आधीपेक्षा जवळजवळ दीड फूट उंच झालेला आहे .या उंच रस्त्यामुळे रस्त्यावरील विजेच्या तारांची उंची कमी झाल्यामुळे शालेय बस चालकांनी विजासन परिसरात बस आनणे बंद केल्याने पालकांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावरील या विद्युत तारा उंच करून मोठ्या वाहनांना सुविधा द्यावी अशी मागणी विंजासन परिसरातील नागरिक करीत आहे.
रस्ता तयार होण्याअगोदर विजासन परिसरात सर्व शाळेच्या बसेस येत होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना आपापल्या घराजवळूनच शालेय बसची सेवा मिळत होती मात्र नवीन तयार करण्यात आलेला रस्ता उंच करण्यात आल्याने विद्युत तारा जवळ आले आहेत त्यामुळे बस सारखे उंच वाहने या रस्त्यावरून चालविणे धोकादायक ठरत आहे. हा धोका टाळण्यासाठी व एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शालेय बस चालक काने या रस्त्यावरून बसची सुविधा देणे बंद केले आहे. आता या शालेय बसेस भद्रनाथ मंदिर चौकात थांबविल्या जातात त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना या चौकापर्यंत पोहोचवावे लागते त्यामुळे त्यांना त्रास होत आहे. अनेक पालक हे आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे ते त्यांना पोहोचू शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक पालकांना आपल्या पाल्यांना भद्रनाग मंदिरापर्यंत पोहोचविण्यास वेळ मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा त्रास होतो आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीने बस विजासन येथून जाईल याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.














