आज दि.१३.०७.२०२४ लेख – माझा गुरू
मानवी जीवनात व्यक्तीला सक्षम बनण्यासाठी सर्वोच्च महत्व दिल्या जाते ते म्हणजे गुरूला. जन्मापासून जगण्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती गुरूविना राहू शकत नाही.याला अपवाद फक्त तथागत भगवान गौतम बुद्ध होत.
व्यक्तीच्या आयुष्यात पहिले गुरूचे स्थान त्याचे आईबाबाकडे जाते. त्याचे लाडिक, बोबडे बोल
आईबाबाकडून शिकलेले असतात. पुढे तेच बोल शहाणे होत जातात आणि बाहेरच्या जगाशी संपर्क साधतात. त्यावेळी त्याला दुसऱ्या गुरूची आवश्यकता भासू लागते. स्वतःला अवगत झालेले ज्ञान, उपयुक्त जीवनानुभव प्रकट करणारी व्यक्ती ,ज्ञान भंडार इतरांसाठी मोकळे करु लागतो. तीच व्यक्ती*गुरू*या संज्ञेत येत असते. अश्या गुरूच्या सहवासात राहून प्रत्यक्षात जीवनानुभूती घेत असतो.
त्याहीपुढे जाऊन ती व्यक्ती गुरूच्या पावलावर पाऊल टाकून लेखांच्या माध्यमातून तो स्वतःच स्वतःचा गुरूशिष्य बनतो.
:’अत्त दीप भव ‘ होतो.
ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्या साठी. ज्ञानसागरात डुबकी मारतो व तो यशस्वी होतो.
त्यातूनच मी सुध्दा घडले. आणि शेवटच्या क्षणी लेख माझा गुरू बनला.
अथांग ज्ञानसागरात
परिस्थितीचें हेलकावे घेत,
कधी खोल डुबकी मारत त्यातून वर येत या देशातील एक प्रचंड,प्रकांड पंडित देशाला तारणारा महान ग्रंथकार बनतो. त्या आपल्या ग्रंथाची निर्मिती जनहितासाठी करतो. त्यातील शब्द नि शब्द दैदिप्यमान बनून लेखांना सजवितो. त्यातूनच एक सोनेरीग्रंथ, वैचारिकग्रंथ
बनून जनतेला न्याय देतो.
त्या लेखांचा आभाळागत ग्रंथ म्हणजे ग्रंथराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्ववंदनीय भारतीय संविधान होय.त्यातील लेख ,कलमे,पुस्तक उघडून बघणाऱ्या व्यक्तीला खूप काही शिकवून जातात. माझ्याही जीवनात अशाच प्रकारे पायघडी घातल्या गेली. म्हणूनच लेख माझा गुरू बनला आहे.
भारताचे संविधान प्रत्येकाची ज्ञानवृद्धी आणि ज्ञानसंवर्धन करत हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देते. असा तो कैवल्याचा धनी आहे. म्हणूनच तो माझा सर्वश्रेष्ठ गुरु आहे.
.. वर्तमान काळात
बरेच लेख वाचनीय असतात. मग ते पुस्तक,मासिक, वर्तमान पत्र किंवा मोबाईलमधील असोत, इतके वाचनिय असतात की त्यातून आभाळागत आनंद मिळतो. कधी वाईट वाटते व चीड येते. डोळ्यातून टपटप थेंब पडतात. हे थेंब खूप काही शिकवून जातात. माणूस म्हणजे काय? देश म्हणजे काय?
मानवता म्हणजे काय,?
**माणसाने माणसाशी मानवाप्रमाणे वागावे**अशी शिकवण ही मिळते. प्रत्येक व्यक्ती एकाच रंगाच्या रक्ताने बनली आहे. त्याचंच नाव लाल आहे, शरिरही स्त्री, पुरुष ही वर्गवारी सोडली तर सारे अवयव सारखे आहेत. श्वास हा अंतिम आहे. छोटी वा मोठी इजा झाल्यास त्यातून ‘लाल ‘रक्तच निघते. जन्म घेण्याचा मार्ग एकच आहे, जाण्याचाही मार्ग एकच ना! मग तीच माणुसकी विषमतेच्या खाईत कां पडते? अनंत प्रश्न माझ्या मनात डोकावतात. त्याचे उत्तर त्याच किंवा अन्य लेखात सापडतात तेव्हा समाधान लाभते.
काही लेख समता,स्वातंत्र्य,न्याय, बंधुता, लोकशाही, हुकूम शाही यांची जाणीव करुन देतात. काही अभ्यासू लेखक राजकीय,आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रावर लिहितात त्यामुळे त्यातून सर्वांगीण ज्ञान मिळते. त्यात जे अयोग्य वाटते त्याला टाळण्याचा प्रयत्न करते. ह्याअश्या लेखांमुळे
देशाची प्रगती व अधोगती
याचे ज्ञान मिळते.
भृणहत्या,बलात्कार, महिलांची नग्नधिंड, विनय भंग ह्या गोष्टीला पेव फुटले आहे. गुन्हेगारास शिक्षा न करता त्यांचा सत्कार केल्या जातो.
जन्म देणारा बापही यात अग्रेसर असल्याचे लेखातून दिसून येते.
अश्यावेळी त्या बापास
गोळ्या घालून ठार करावे असा विचार मनात घर करतो. अनैतिकतेसाठी कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा लेखांचे समर्थन करण्यास मी सज्ज असते. देशामध्ये गतिमान आणि कार्यक्षम कारभार यांचे दावे होत आहेत, असे असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? ही फार मोठी समश्या आहे. त्या समस्यांचे मूळ शोधून निराकरणाचे प्रयत्न करायला हवेत. ही जबाबदारी संवेदनशील राज्यकर्त्यांनी स्वीकारायला हवी.शेतकऱ्यांच्या समस्यांचे लेख वेदनादायी वाटतात. वास्तववादी स्थीती कळते.त्यामुळे लेख माझे खरे गुरु ठरतात.
काही लेखांमध्ये भावनांना सावरणाऱ्या मैत्रीचे महत्व वाचायला मिळते. निखळ मैत्री, स्वार्थी मैत्री, राजकीय मैत्री यांचेही ज्ञान लेखातून मिळतं. असे वाचता वाचता पुस्तके, त्यातील लेख माझे घट्ट मित्र बनून जातात.
चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, नाटक, कादंबरी ई. साहित्यांचे वाचन केल्यामुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली.जे जे उत्तम ,उदात्त त्यातूनच लिहिण्याची प्रेरणा मिळत असते. जे जे प्रेरणादायक असेल ते ते त्यावेळी गुरूची जागा घेत असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
लेखिका – निर्मला धर्मदास जीवने
नागपूर

