संविधान म्हणजे नेमके काय?संविधान म्हणजे कायदेशीर राज्याचा प्राण.प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण विकास साधण्याची समान संधी उपलब्ध करून देणारा मुख्य दस्तऐवज म्हणजे आपले संविधान.
आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे.लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.अशी व्याख्या अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंक यांनी केली होती. संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात ” आम्ही, भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास: सामाजिक , आर्थिक व राजनैतिक न्याय ,विचार, अभिव्यक्ती ,विश्वास , श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य ; दर्जाची आण संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.”
आज आपल्या लक्षात येईल की,स्वातंत्र्य ,समता , बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित भारतीय संविधान कार्यरत आहे. नवसमाज व नव भारताची निर्मिती करण्यासाठी मी प्रथमत: भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहे , असा महान संदेश या देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे भारतीय संविधान होय.भारतीय संविधान म्हणजे मानवी हक्कांची सनद आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
संविधानाने आपल्याला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत.समानतेचा हक्क,स्वातंत्र्याचा हक्क ,मालमत्तेचा हक्क,आणि संविधानिक उपाययोजनाचा हक्क.
भारतीय संविधानाने नागरिकांना जे मूलभूत हक्क दिलेले आहेत,त्या हक्कांमुळेच प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून सन्मानाने जगू शकतो.शासनसंस्थांवर आपले नियंत्रण ठेवू शकतो.भारताचे संविधान दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत स्वतःप्रत अर्पण केले या ऐतीहासिक घटनेला आता ७५ वर्ष पूर्ण होत आहेत.दिनांक २६ जानेवारी १९५० ला पूर्णपणे संविधानाचा अंमल सुरू झाला आणि देश लोकशाही गणतंत्र झाला.
भारतीय संविधान हे ०२ वर्ष ,११ महिने व १८ दिवसात प्रत्यक्ष स्वरूपात आकाराला आले.ही भारताची राज्यघटना महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली.जगातील ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.
लेखक -प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी ,जिल्हा गडचिरोली

