रक्षाबंधन हिंदू धर्मातील बहिण-भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणारा पवित्र सण.हा सण श्रावण महिन्यात येतो.रक्षाबंधन श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जात असल्याने याला “राखी पौर्णिमा” असे देखील म्हणतात.या सणाला कोकणात”नारळी पौर्णिमा” असे संबोधले जाते.या सणाला बहिण भावाला ओवाळते, त्याला टिळा लावून त्याची आरती ओवाळते.त्यानंतर राखी किंवा रक्षासूत्र भावाच्या मनगटावर बांधते.त्यानंतर भावाला मिठाई भरवते.असे करून बहिण भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते.बहिण भावाला जी राखी बांधते त्या स्नेहबंधातून भाऊ बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देत असतो.
रक्षाबंधन सणाच्या दिवशी घरात गोडधोड पदार्थ बनविले जातात. “प्रत्येक स्त्री ही भगिनीसमान असते आणि तिच्याकडे पवित्र दृष्टीने पाहावे” असा संदेश राखी हा सण देत असतो.हा उत्सव भाऊ आणि बहिणीच्या नात्याची वीण अधिक घट्ट करतो.हा सण भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे.रक्षाबंधन म्हणजे “रक्षा बांधणे”. बहिण-भावाच्या नात्यात आपुलकी, सुरक्षा या भावनांची उन्नती करणे हे या सणाचे खास वैशिष्ट्य आहे.भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधन सणाविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत.त्यातील एक कथा म्हणजे द्रौपदीने कृष्णाच्या बोटाला झालेल्या जखमेवर आपली साडी फाडून तिची चिंधी कृष्णाच्या बोटाला बांधली होती.त्यावेळी कृष्णाने द्रौपदीला वचन दिले होते की तो तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असेल.राखी एक पवित्र धागा आहे जो बहिण भावाच्या मनगटावर बांधते.बहिणीने भावाला ओवाळले की सारे वातावरण पवित्र होऊन जाते.भाऊ राखी बांधल्यावर बहिणीला तिच्या सुरक्षेचे वचन देतो.म्हणजेच राखी सुरक्षा प्रदान करण्याचे प्रतिक आहे.राखी या सणाला परिवारातील सदस्य एकत्र येऊन राखी साजरी करतात.त्यामुळे परिवारातील प्रेम वृध्दिंगत होण्यास आणि ऐक्य वाढीस लागण्यास हातभार लागतो.सामाजिक नात्यांमध्येही स्त्रिया मानलेल्या भावांना राखी बांधतात.एकंदरीत राखी सण समाजात एकोपा निर्माण करतो.
रक्षाबंधनाला विविध ठिकाणी लोककला, नृत्य,संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.या कार्यक्रमांमुळे लोकांना आपल्या संस्कृतीची ओळख होते.हा सण आपल्याला आपल्या परंपरांचे स्मरण करून देतो. भाऊ-बहीण एकमेकांपासून दूर राहत असतील तर बहिणी भावांना कुरिअरद्वारे किंवा पोस्टाने राखी पाठवतात.हल्ली अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन राख्या पाठवतात.पण माझ्या मते तरी हे बरोबर नाही.एकमेकांना जर भेटून राखी सारखा सुंदर आणि पवित्र सण साजरा केला जाऊ शकत असेल तर नक्कीच करायला हवा.एकमेकांना भेटून साज-या केल्या जाणाऱ्या सणांमुळे जिव्हाळा, आपुलकी निर्माण होते.सणांचा उद्देश आपापसातील कौटुंबिक आणि सामाजिक एकता वाढवणे आहे.रक्षाबंधन खरोखरच सुंदर परंपरा आहे.
लेखिका लैलेशा भुरे
नागपूर

