आजची कविता – स्त्री जन्मा तुझी कहाणी
या दुःखानो या हो या तुम्ही माझ्या घरी
मी अंथरल्या पायघड्या फुलांच्या दारी
वेदनेच्या सूरानो गा तुमचे गीत अता
वाजवीत मंजुळ शहनाई गीत ऐकता
जळले आयुष्य न् झाली राख भावनांची
उरली कुठे भिती आता जळत्या श्वासांची
कितीदा बळी पडले पुरुषी अहंकाराला
शिकले बघ आता कवटाळणे चांदण्याला
किती टोचले भाले भोग वस्तू समझले
रक्षण करण्यास मी माझे तलवार झाले
जीवनाची हवेली त्यात किती खोल्या
गवाक्षातून दिसती मी मारलेल्या फुल्या
जुळले नाते तुझ्या नभाशी घाव अंतरी
स्वप्न काळजातले बांधले निळ्या अंबरी
मी स्री, ओवाळते आरती संकटाना
गंधाळते आयुष्य मग ऋतू नसताना
कवियत्री – गुलाब अनिल वेर्णेकर…गोवा

