नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर येण्यासाठी मी रांगेत उभा होतो.
माझ्या मागे एक सुंदर आणि गोरीगोमटी मुलगी उभी होती.तिच्या मागे तिची आईसुद्धा उभी होती.त्यांच्या बोलचालीवरून कळले की त्या दोघी लंडनमध्ये राहतात.मी चुपचाप त्यांचं सगळं बोलणं ऐकत होतो.तितक्यात त्या मुलीने मला ‘हाय ‘ म्हटले.मी मुद्दामच तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझी मान दुसरीकडे वळवली.तिला या गोष्टीचे जरा आश्चर्य वाटले की मी तिच्या ‘हाय’ वर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.तिने तिचे विजिटिंग कार्ड काढून मला दाखवले.मी अनिच्छेनेच तिचे कार्ड घेतले आणि बघितले.त्यावर तिचे नाव लिहिले होते…’फेयरी’ मी तिला हसतच म्हटले -“फेयरी? म्हणजे परी.सुंदर नाव आहे अगदी तुझ्यासारखच.” यावर फेयरी म्हणाली -“आम्ही लंडनला जरी रहात असलो तरी आम्हाला हिंदी येते.इथे मी माझ्या मामाकडे आले आहे.फेयरी हे नाव माझ्या आईने ठेवलं आहे.माझ्या आईने एका इंग्रज माणसाशी लग्न केलं होतं.ती भारतीय आहे पण गेल्या सत्तावीस वर्षांपासून ती लंडनमध्ये राहतेय.”
फेयरी अतिशय शांत आणि शालीन वाटली.मी तिला सहजच विचारले -” तू कुठले जेवण जेवतेस?व्हेज की नाॅनव्हेज?”
यावर ती म्हणाली -” नाॅनव्हेज” परत मी तिला विचारले -,”मग मला सांग तू दात किती वेळा स्वच्छ करतेस?” ती म्हणाली -” फक्त एकदाच सकाळी.”मी म्हणालो -“मी तर सकाळ-संध्याकाळ दात स्वच्छ करतो. अशाने तुझे दात लवकर पडतील.माणसाचा फक्त चेहराच सुंदर असून चालत नाही तर त्याच्या सवयीसुध्दा सुंदर असायला पाहिजे.”तिने माझ्याकडे बघत ‘हो’ म्हटले.त्यावेळी मी २८ वर्षाचा आणि ती २५ ची होती.आता मी विमानतळाच्या बाहेर आलो.मी तिला ‘बाय’ म्हटले आणि टॅक्सी घेण्यासाठी समोर गेलो तेव्हा फेयरीने मला विचारले -“तुम्ही कुठे जाताय?” मी म्हणालो -“मला सिव्हिल लाइन्सला जायचे आहे.” यावर ती म्हणाली -“आम्हाला सुध्दा तिथेच जायचे आहे.” असे बोलून त्या दोघी माझ्याच टॅक्सी मध्ये बसल्या.आमची टॅक्सी विमानतळावरून निघाली.तोपर्यंत टॅक्सी मध्ये कुणीच कुणाशी बोललं नाही.आम्ही अर्ध्या तासात सिव्हिल लाइन्सला पोहचणार होतो.सिव्हिल लाइन्सच्या अर्धा किलोमीटर आधीच टॅक्सीचं चाक पंक्चर झालं.आता आम्हाला तेथून पायी जावे लागणार होते.आम्ही टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन पायी चालायला लागलो.फेयरी तिच्या आईला म्हणाली -” आई तू पुढे हो.मी यांच्याशी गप्पा करत येते.”तिची आई पुढे निघाली आणि आम्ही दोघे गप्पा मारत पायी चालायला लागलो.तिच्याशी गप्पा मारताना मी तिला आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल बरंच काही सांगितलं.ती माझे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होती.ती म्हणाली -” मला भारतीय संस्कृती खूप आवडते.देवळात जाणे, पूजापाठ करणे,मोठ्यांचा आदर करणे मला आवडतं.” तिने सांगितले की ती भारतात फक्त दहा दिवसांसाठी आली आहे.दहा दिवस पर्यंत मी रोज संध्याकाळी तिच्या मामाकडे जाऊन त्या दोघींना भेटत होतो.या दहा दिवसांत मी तिला ब-याच भारतीय गोष्टी सांगितल्या.लंडनला जाण्याच्या एक दिवस आधी ती मला म्हणाली -“मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.” मी अवाक होऊन तिच्याकडे पाहिले.मी जरा गोंधळलो पण लगेच स्वतःला सावरत म्हणालो – तू माझी छान मैत्रीण आहेस.माझे लग्न मागल्या वर्षीच झाले.” यावर ती काहीच बोलली नाही.दुस-या दिवशी तिला जायचे होते.पण मी तिला भेटायला गेलो नाही.ती लंडनला निघून गेली.
चार महिने उलटल्यानंतर तिचे मला पत्र आले.त्यात लिहिले होते -“मी रामायण, महाभारत,भागवत इत्यादी भारतीय ग्रंथांचे वाचन केले आहे.तू माझे जीवन बदलून टाकलेस.मी तुला माझा कृष्ण मानले आहे.मी तुला नाही मिळवू शकले.आता मला दुस-या कुणाचेही व्हायचे नाही.माझ्या मनात फक्त तुझ्यासाठीच जागा आहे.मी आता पूर्ण शाकाहारी झाले आहे.सकाळ-संध्याकाळ दात पण स्वच्छ करते.देवाची पूजा पण रोज करते.”
तिचे पत्र वाचून मी स्तब्ध झालो.मनात विचार आल – इतकं प्रेम,इतका आदर! या कलियुगात इतकं निखळ प्रेम! मी तिला पत्र लिहून समजावले की असा वेडेपणा तिने करू नये.तिने लग्न करून आपला संसार थाटावा.पण ती काही ऐकायला तयार नव्हती.माझ्या मनात विचार आला -‘ धन्य आहे भारतीय संस्कृती,जिने एका विदेशात जन्म घेतलेल्या मुलीला येथील कलेत, संस्कृतीत सामावून घेतले.” मला आता कळून चुकले होते की या नश्वर शरीरापासून दूर राहून सुद्धा माणूस नेहमी मनात राहू शकतो
लेखिका – लैलेशा भुरे
नागपूर

