आजचा लघुलेख – भारतीय संविधान राष्ट्राचा प्राण

0
83

संविधान म्हणजे नेमके काय? संविधान म्हणजे कायदेशीर राज्याचा प्राण. प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण विकास साधण्याची समान संधी उपलब्ध करून देणारा मुख्य दस्तऐवज म्हणजे आपले संविधान.
थोडक्यात कोणत्याही देशाद्वारे जाणकारांच्या मदतीने अशी काही नियमावली तयार केली जाते की ज्यामुळे देशाचा कारभार सुसूत्रपणे आणि सुरळीत चालतो. या नियमांच्या एकत्रिकरणाला त्या देशाचे ‘संविधान’असे म्हटले जाते म्हणजेच संविधान हे देशाचे कायदेशीर लिखित दस्तऐवज असते ,त्यात त्या देशाच्या कारभारासंदर्भातले सर्व नियम व तरतुदी एकत्रित व सुसूत्रपणे नमूद केलेल्या असतात. संविधानातील तरतुदींनुसारच त्या देशाचा राज्यकारभार करण्याचे बंधन तेथील शासनावर असते .संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व जगातील बहुतेक सर्व देशांनी स्वीकारलेले आहे.असे असले तरी जगातील प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप हे त्या देशाचा इतिहास , समाजरचना, संस्कृती,परंपरा व उद्दिष्टानुसार वेगवेगळे असते.
आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे.लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.अशी व्याख्या अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंक यांनी केली होती. संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात ” आम्ही, भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास: सामाजिक , आर्थिक व राजनैतिक न्याय ,विचार, अभिव्यक्ती ,विश्वास , श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य ; दर्जाची आण संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.”
आज आपल्या लक्षात येईल की,स्वातंत्र्य ,समता , बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित भारतीय संविधान कार्यरत आहे. नवसमाज व नव भारताची निर्मिती करण्यासाठी मी प्रथमत: भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहे , असा महान संदेश या देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे भारतीय संविधान होय.भारतीय संविधान म्हणजे मानवी हक्कांची सनद आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
संविधानाने आपल्याला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत.समानतेचा हक्क,स्वातंत्र्याचा हक्क ,मालमत्तेचा हक्क,आणि संविधानिक उपाययोजनाचा हक्क मिळवून दिले आहे.भारतीय संविधानाने नागरिकांना जे मूलभूत हक्क दिलेले आहेत,त्या हक्कांमुळेच प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून सन्मानाने जगू शकतो.शासनसंस्थांवर आपले नियंत्रण ठेवू शकतो.भारताचे संविधान दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत स्वतःप्रत अर्पण केले या ऐतीहासिक घटनेला आता ७५ वर्ष पूर्ण होत आहेत.दिनांक २६ जानेवारी १९५० ला पूर्णपणे संविधानाचा अंमल सुरू झाला आणि देश लोकशाही गणतंत्र झाला.
भारतीय संविधान हे ०२ वर्ष ,११ महिने व १८ दिवसात प्रत्यक्ष स्वरूपात आकाराला आले.ही भारताची राज्यघटना महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली.जगातील ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.
संविधानाचे महत्व लोकांना कळावे यासाठी त्यांना जागृत करणे गरजेचे आहे.संविधान हा कोणत्याही स्वतंत्र व सार्वभौम देशाचा एक अतिशय महत्वपूर्ण असा कायदेशीर दस्तऐवज असतो.असा कायदेशीर दस्तऐवज काही एकाएकी किंवा सहजरित्या निर्माण होत नाही.यासाठी कोणत्याही देशाला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागतो आपल्या देशाचे संविधान अशाच प्रकारे मोठ्या संघर्षमय स्वरूपातून निर्माण झालेले आहे कारण ब्रिटिश भारतात येण्याअगोदर भारत हा काही लोकशाही प्रधान देश नव्हता त्यावेळी येथे राजे – महाराजे, सुलतान, बादशहा यांचे राज्य होते आणि हे सर्व आपापल्या गृहीतांच्या मान्यतेने राज्यकारभार करत असतो समाज जीवनावर देखील पुरोहित शाहीतून आलेल्या धर्म संकल्पना आणि परंपरांचा प्रभाव होता त्यामुळे लोकशाहीची मूल्ये आपल्या समाजजीवनात तसेच राज्यक्षेत्रात कशाप्रकारे, रुजत गेली आणि भारतात होत गेली हे जाणून घेण्यासाठी हा सर्व विस्तृत प्रवास जाणून घेणे देशाच्या प्रत्येक भावी तसेच सुजाण नागरिकांसाठी अत्यावश्यक आहे.
संविधान हा देशाचा ‘मूलभूत कायदा’ असतो. गरजेनुसार वेळोवेळी बनवण्यात येणारे इतर कायदे हे देखील त्या देशातील संविधानात असलेल्या मूळ कायद्यांच्या अनुरूपच बनवण्यात आलेले असतात.प्रत्येक देशाला संविधानाची नितांत आवश्यकता असते. संविधानामुळेच त्या देशातील शासन नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करते.
जगात आदर्श संविधान म्हणून भारताच्या संविधानाचा गौरव केला जातो.याचे कारण भारताचे संविधान हे न्याय , स्वातंत्र्य, समता व बंधुता या चार मानवी मूल्यांवर आधारलेले आहे.भारताच्या संविधानाने भारताच्या सर्व नागरिकांस व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता दिली.म्हणजेच भारतीय संविधान राष्ट्राचा प्राण आहे.

लेखक प्रा.नानाजी रामटेके
कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा (ठाणेगाव) तालुका आरमोरी,जिल्हा गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here