prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

0
138

​अंधारलेल्या वाटांवरती,
ज्ञानाची ज्योत तू पेटवलीस,
रुढी-परंपरांच्या बेड्या,
धैर्याने तू तोडलीस….१.

शेण-गोट्यांचा मार सोसून,
तू हसत कळी फुलवलीस,
सावित्री, आमच्या आयुष्याला,
खरी दिशा तू दाखवलीस…२.

​”तू पंख दिलेस” आम्हा,
ध्येयवेड्या भरारीचे,
स्वप्न पाहण्या शिकवले,
आणि नभ कवेत घेण्याचे…३.

*ज्या हातांत होती केवळ,
रांधा वाढा आणि भांडी,
त्या हातांत दिली लेखणी,
आणि प्रगतीची गुढी…४.

अज्ञानाच्या अंधकारात,
आम्ही अडकून पडलो होतो,
तू दिलेल्या प्रकाशाने,
आज स्वतंत्र आम्ही झालो आहोत…५.

​शिक्षण हीच शक्ती आहे,
हा मंत्र तू दिलास,
अभिमानाने जगण्याचा,
नवा मार्ग तू उघडलास….६

आज आम्ही जे काही आहोत,
ते तुझ्याच त्यागाचे फळ,
तूच दिलेस मनाला आमच्या,
जिद्दीचे अफाट बळ…७.

*सावित्री, तू केवळ नाव नाहीस,
तू एक विचार आहेस,
आमच्या पंखातली ताकद,
आणि आमचा स्वाभिमान आहेस…८.

आकाशाला गवसणी घालू,
असा विश्वास आम्ही धरतो,
तुझ्या चरणी नतमस्तक होऊन,
कृतज्ञता व्यक्त करतो…९.

सौ.अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here