
तेज पुंजाचे ओज आगळे,
मुखावरी त्या कांती
डोळ्यांमधुनी ओसंडते,
अथांग शांत नि क्रांती….१.
भगवे अंबर, हाती काठी,
ध्येयाचे ते वेड
अज्ञानाच्या अंधाराला,
घालूनी बसले वेढ….२.
’शिकागो’ च्या त्या धर्मसभेने,
विश्व थक्कची झाले
‘बंधू-भगिनी’ शब्दांनी मग,
अवघे नाते जुळले…३.
हिंदुधर्माची विजयपताका,
दिगंतरी फडकविली
भारतीय संस्कृतीची महती,
जगास त्यांनी पटविली….४.
“उठा, जागा अन् ध्येय गाठण्या,
थांबू नका ही साद”
युवा पिढीच्या काळजामध्ये,
घुमतो त्यांचा नाद…५.
आत्मबळाचा मंत्र सांगुनी,
मरगळ झटकून दिली
मानवतेच्या सेवेची मग,
नवीच पहाट झाली…६.
दबल्या-पिडल्या दीन-दलितांत,
पाहिले त्यांनी देव
मानवसेवा हीच खरी तर,
ईश्वरभक्तीची ठेव…७.
विवेकाचा सूर्य तळपतो,
विचारांच्या या नभी
प्रणाम असो या महापुरुषाला,
वंदू चरणी आम्ही…८.
सौ. अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाणा















