
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचांदूर : वाढती स्पर्धा लक्षात घेता ग्रामीण भागातील होतकरू तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख बनविण्यासाठी स्पर्धा परीक्षा शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंदांच्या जयंती प्रित्यर्थ प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयात करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष मा. संजयजी मेंढी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेरणा कॉलेजचे उपाध्यक्ष मा.बालाजी पुरी होते. युवा उद्योजक नगरसेवक तुषार बावणे यांनी विद्यार्थ्यांना परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे मार्गदर्शन केले. शिबिरात प्रामुख्याने विजय अकॅडमीचे माधव चलवाड, रामप्रसाद गांगर्डे , टाटा समूह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील मा.प्रदीप चामले , तेजस्विनी कवठे जालना,प्रा . चेतना कामडी – येरणे, प्रा.विवेक पाल, अरविंद मुसने, प्रा.धनश्री चिताडे, प्रा.बाळू उमरे, दिवाकर राऊत, मा.रमेश राठोड ,प्रा. दुर्गावती खुबाळकर, प्रा. छाया गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षेचे नियोजन कसे केले पाहिजे, सातत्य आणि प्रामाणिकपणा कसा महत्त्वाचा आहे , याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन माधव चलवाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केले. दररोज विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्याकरिता गृहपाठ देण्यात आला. वास्तविकतेचे भान ठेवत विद्यार्थ्यांनी परीक्षाभिमुख बनत स्मार्टवर्क करण्याविषयी मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
मार्गदर्शक रमेश राठोड यांनी बदलत्या परीक्षा पद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “केवळ कष्ट करून चालणार नाही, तर बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार योग्य रणनीती आखणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.” विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
तर प्रा. अरविंद मुसने यांनी “विद्यार्थ्यांच्या मनात प्रशासकीय सेवेबद्दल असलेली भीती दूर करून त्यांना आत्मविश्वासाने सज्ज करणे हाच या शिबिराचा मुख्य हेतू आहे. भविष्यातही अशा प्रकारचे मार्गदर्शक उपक्रम राबवण्यास महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मार्गदर्शन करताना प्रा. चेतना कामडी- येरणे म्हणाल्या की, “कसोशीने परिश्रम केल्यास यश नक्की मिळते. स्पर्धेच्या युगात तयारी करताना विद्यार्थ्यांनी अद्यावत ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. दैनंदिन वर्तमानपत्रातील महत्त्वपूर्ण नोंदी घेत स्वतःला सतत अपडेट ठेवले, सातत्य राखले आणि विषयानुसार नियोजनबद्ध अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश निश्चित मिळते.
पुढे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, विविध विषयांचा अभ्यास कसा करावा आणि अभ्यासातील सातत्य कसे टिकवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.युवा चेतना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी सखोल व उपयुक्त मार्गदर्शन प्रा बाळू उमरे, प्रा.विवेक पाल या मान्यवरांनी केले.
या सहा दिवसीय शिबिरात स्पर्धा परीक्षेचा आवाका, वेळेचे अचूक नियोजन आणि मुलाखतीची तयारी यांसारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. दुर्गावती खुबाळकर मॅडम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा .छाया गायकवाड यांनी मानले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी यश ताकसांडे ,कुंजन शेंडे, अजय कोटनाके, अर्चना मुत्यालवार, रविंद्र पवार, पवन पिंपळकर,विक्रम थेरे, साक्षी गुरनुले,तृप्ती ठाकरे, राखी पोटदुखे, सलोनी उईके, करीना परचाके, तन्वी चहाकाटे आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.















