
नारी: आई, पत्नी अन् मुलगी – प्रेमाचे त्रिवेणी रूप
कधी वात्सल्य, कधी माया,
कधी त्यागाची मूर्ती,
नारी विना अधुरी आहे,
या जगाची कीर्ती….१.
तीन नाती, तीन रूपे,
एकच तिची शक्ती,
तिच्या चरणी अर्पिली आहे,
साऱ्या जगाची भक्ती….२.
आई : प्रेमाचा अथांग सागर
सर्वात आधी रूप तिचे,
‘आई’ होऊन येते,
स्वतः उपाशी राहून ती,
घास मुखी देते…३.
बोट धरून चालायला,
तीच आपल्याला शिकवते,
संकटाच्या वेळी आई,
ढाल होऊन उभी राहते…४.
पत्नी : संसाराचा भक्कम आधार
अर्धांगिनी होऊन जेव्हा,
घरामध्ये ती येते,
सुखा-दुखात खंबीरपणे,
सोबत आपली देते….५.
संसाराचा डोलारा ती,
लिलया पेलून धरते,
घराचे घरपण फक्त,
तिच्यामुळेच उरते….६.
मुलगी : घराचे हसरे अंगण
कधी परी, कधी चिमणी,
मुलगी होऊन हसते,
बापाच्या काळजाचा तुकडा,
घराची शान असते….७.
दोन घरांना जोडणारा,
ती तर रेशीम धागा,
तिच्या निरागस हास्याने,
मिटते मनाची भेगा…८.
आई, पत्नी, मुलगी अशी,
तिची त्रिवेणी रूपे,
तिच्यामुळेच आयुष्याला,
मिळती नवी दीप्य रूपे….९.
नारीशक्तीचा सन्मान करूया,
देऊया तिला मान,
कारण स्त्री हीच आहे,
या सृष्टीचा खरा प्राण!…१०.
सौ. अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना















