
थिजला श्वास जेंव्हा,
सीमा रक्ताने न्हाली
देशाच्या रक्षणासाठी,
एक ज्योत शांत झाली…
नव्हती फिकीर मरणाची,
ना कुटुंबाची आस
मनात फक्त जपला होता,
तिरंग्याचा ध्यास…
कडकडत्या थंडीत अन,
पेटत्या उन्हातही
सह्याद्रीच्या कड्यावरी,
अन बर्फाळ रानातही…
अविचल उभा राहिला,
तो काळजाचा तुकडा
छातीवरती झेलला त्याने,
गोळ्यांचा तो धडा….
आठवण शहिदांची…
ती माय रडली असेल,
तो बापही खचला असेल
पण छातीवरचा अभिमान,
आसवांना पुसत असेल…
अर्धवट राहिलेली स्वप्ने,
अन् सुन्न झालेली नाती
तुमच्याच त्या रक्ताने,
पावन झाली ही माती…
फडकतोय हा झेंडा,
तुमच्याच त्या शौर्यामुळे
घेतोय श्वास आम्ही,
तुमच्याच त्या धैर्यामुळे…
शब्दांत कसे मांडू,
तुमचे हे बलिदान थोर
तुमच्याच ऋणापायी,
हा देश झालाय थोर…
नमन करतो तुम्हा,
झुकवूनिया हे माथा
पिढ्यानपिढ्या गाऊ आम्ही,
तुमचीच विजयगाथा…
मरण जरी आले तरी,
नाव तुमचे अमर राहील
हिंदुस्थानचा प्रत्येक सुपुत्र,
तुम्हालाच सलाम देईल!…
सौ.अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना















