त्यागमूर्ती रमाईला
माझे शतशः वंदन
जिच्या जीवनाला खरी
शोभे उपमा चंदन!
तिने घेतला पदरी
आनंदाने वनवास
परी पतीच्या मनीचा
नाही ढळू दिला ध्यास!
शेणगोवऱ्या विकूनी
तिने चालविले घर
स्वाभिमानाने नांदली
दु:खासवे जन्मभर !
बाबासाहेबांच्या ध्येया
वाट मोकळी ठेवली
धुरा दृढतेची तिने
मोठ्या धीराने तोलली!
वाट विस्तवाची जशी
चालली ती उमजून
कोटी लेकरांचे भाग्य
खूणगाठीस बांधून!
तिचे ऋण एवढे की
शब्दांत न मावणारे
माझ्या धमन्यांत तेच
अविरत धावणारे!
आहे कल्याण जे झाले
साऱ्या भारतवर्षाचे
त्यात बाबांच्या जोडीने
आहे श्रेय रमाईचे!!
कवी-महादेव भोकरे
वडूज (सातारा)

