prabodhini news logo
Home जपान लेख – आयुष्य जगताना… १ ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय

लेख – आयुष्य जगताना… १ ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय

0
225

आपला ना जन्म आपल्या हातात असतो, ना मृत्यु. मग आपल्या हातात असते तरी काय?

जसे जन्माला आलो तसे ह्या जगातून एक दिवस निघून जाऊ. पुढच्या दोन पिढ्या फक्त आपलं नाव लावतील, त्यानंतर कुणी आपल्याला विचारणारही नाही. हळू हळू घरांच्या पाट्यांवरून लुप्त होत आपण कुठे तरी तहसील च्या कार्यालयात एखाद्या गाठोड्यात पडलेल्या जुन्या, धुळाने माखलेल्या फाईलमध्ये कुठल्यातरी कुजलेल्या पानावर तेवढं आपलं नाव राहील…

ह्या धरेवरून निघून जाताना तेवढे आपण लोकांच्या डोळ्यात पाणी देऊन जावू…तेही काही क्षणा साठी… हो ना?

जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय।।

सगे सोयरे डोळे पुसतील। पुन्हा आपल्या कामी लागतील।।

उठतील बसतील हसुनि खिदळतील। मी जातां त्यांचें काय जाय।।

असे सगळ्यांचे होणार आहे…. उगाच सत्याला शब्दांची जोड नकोच

खरच ना साहित्यिक भास्कर तांबे ह्यांच्या ह्या ओळी मनाला आरपार छेदून जातात.

करोडो जन्माला येतात आणि कुणाला न कळता मृत्युही पावतात. आता ह्या क्षणाला किती नवीन जीव ह्या धरेवर जन्माला आली असतील माहित आहे का?

अहो एका मिनिटाला जवळपास अडीचशे ते तीनशे बाळ जन्माला येतात संपूर्ण जगात. किती हा आकडा!

आता विचार करा मरण्याचा दरही जेमतेम एवढाच ना? मग कोण आलं आणि कोण गेलं हे कुठे कुणाला समजलं!

हे तर आपल्याला माहीत आहे जो जन्माला आलाय तो मरणार नक्की. अमृत कुठे कुणी प्राशन केलंय! मग ह्या जरा मरणाच्या मध्ये जो काळ आपल्या हातात आहे तोच ओळखून आपल्या अस्तित्वाचे कारण शोधावे आणि तसे जगावे तर ते जगणे नाहीतर ते जगणे काय!

ह्या महान भूतलावर आपण काय नुसते ये-जा करण्यासाठी तर आले नसू… काय?

मी जपान मध्ये आता सतरा वर्ष होतील राहत आहे. उगवल्या सूर्याचा देश बरं का जपान. पण गंमत बघा तिथे मावळणारे कमी आहेत. गडबड झाली ना समजण्यात. तसे नाही, अहो ह्या देशात लोकं लवकर अस्ताला जात नाहीत. अर्थात लवकर स्वत:ला गुंडाळून घेत नाही. जोवर स्वत:च्या अस्तित्वाचा उद्देश सिद्ध होत नाही तोवर शोध सोडत नाहीत आणि एकदा का तो गवसला की मग जगणे सोडत नाहीत. झाली ना डबल इनिंग! एक आयुष्य आपल्यांसाठी आणि एक आपल्यासाठी जगताना इथले लोक बघितले की मग मा‍झ्या मायभूमीची आठवण येते.

लेखिका उर्मिला देवेन
जपान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here