पतीच्या फोटोला लावलेला भला मोठा हार बघताना तीला परत परत रडू येत होतं…
आठवत होता आत्ता पर्यंतचा संसार…
दोन्हीही मुलं आईच्या कडेला शांत पणे बसून होती…
मोठा यश आज आय ए एस होऊन मोठया पगाराच्या सरकारी नोकरीत रुजू झाला होता तर छोटी अजून शिकत होती…!
आज मोठया मुलाच्या पहिल्या पगाराचा दिवस होता…
स्वतःच्या हिमतीवर मुलांना चांगलं शिक्षण देऊन मुलं मोठी झालेलं बघणं म्हणजे आई वडिलांना अहोभाग्याचा क्षण असतो आज तिला तो बघायला मिळाला पण दुर्दैवाने
आज यशचे बाबा या जगात नव्हते…!
तिचे मन परत भूतकाळात शिरले
जेव्हा त्यांना कॅन्सरचे निदान झाले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली होती….!
मुले त्यावेळी लहान होती, त्यांच्यापुढे ती आपल्या पतीच्या आजाराबद्दल काहीच बोलू शकत नव्हती. तिने देवापुढे जाऊन देवांशीच भांडण केले, देवा मी आणि माझे पती दोघेही तुझी खूप सेवा करतो ना रे ? मग आमच्या वाट्याला का हे सर्व दिले ?
अगदी छोटी मुले आपल्या आईशी भांडतात त्याप्रमाणे ती देवाशी भांडू लागली पण देव तरी काय करणार ?
कर्माचे भोग कोणाला चुकले का कधी ?
ते तर भोगून जायचे आहेत. तिने खूप विचार केला मग पतीला म्हणाली तुम्ही काळजी करू नका, सर्व ठीक होईल…
तिला सर्व कळत होतं की काहीच ठीक होणार नाहीये आपला पती आता काही दिवसाचा सोबत ती आहे,
पण तरीही ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. आपल्या पतीला तिने अजिबात खचू दिले नाही. नेहमी त्याची ढाल बनून त्याच्या सोबत उभी राहिली.
ते आजाराने दिवसेंदिवस खूप खचत चाललेले होते.
मुलं त्यांना विचारू लागली, बाबा तुम्ही असे का वागतात ? काही झाले का तुम्हाला ?
मुलांचे प्रश्न ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हसतं खेळत घर आपलं…त्यात तो मुलासोबत रोज गप्पा करत असे. छोट्या मुलीला तर गाडीवर बसून रोज फिरायला घेऊन जात असे. पंधरा दिवसातून बायको मुलांसोबत तो फिरायला जात असे पण आता तसे काही होत नव्हते.
त्याची तब्येत खूपच खालावू लागली…
आयुष्यातील उरलेला प्रत्येक क्षण आपल्या बायको पोरांसोबत घालवावा असं त्याला वाटू लागले. नेहमी आपल्या बायकोवर रागावणारा, चिडणारा तो, आज तिच्यावर खूप प्रेम करू लागला.
तिला जवळ घेऊन आपल्या उरलेल्या आयुष्याचे गणित मांडू लागला होता.
त्याचे म्हणणे माझ्या मृत्यूनंतर तू आपल्या दोन मुलांना आपल्या दोघांचं प्रेम देशील ना ? त्यांना शिकवून खूप मोठं करशील ना ? त्यांना त्यांच्या पायावर उभं करशील ना ?
असे एक ना अनेक प्रश्न तो आपल्या बायकोला करू लागला . तो अगदी काकुळतीला येऊन तिच्याशी बोलायचा…
त्याच्या बोलण्यावर काही काही सुचत नव्हते.
आपल्या पती शिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नव्हती. तिचा पती तिच्या जगण्याचं बळ होता. तिचा आयुष्य होता तो. त्याच्याशिवाय आपण कसे जगणार, आपल्या चिमुकल्या दोन मुलांना कसे सांभाळणार ही कल्पनाच तिला आतून पूर्णपणे पोखरून टाकत होती. तरीही तिने काळजावर दगड ठेवून आपल्या पतीला शब्द दिला की, मुलांना मी खूप मोठं करेन, एक दिवस तुमची मुलं तुमचं नाव मोठं करतील. त्यांच्यावर मी खूप चांगले संस्कार करेन. त्यांना कधीच तुमची कमी भासू देणार नाही असे ती आपल्या पतीला सांगू लागली. तिचे हे बोलणे ऐकून ते शांत झाले. पण त्यांना मनातून आपल्या बायको पोरांची खूप काळजी वाटत होती.
आपली पत्नी खूप धीराची आहे हे त्यांना माहिती होते. ते डोळे बंद करून शांत झोपून गेले. इकडे तीची काळजी वाढू लागली. कोणाचाही आधार नसताना आपल्यावर येणाऱ्या प्रसंगाला कसं सामोर जायचं तिला काहीच कळेना. विचार करत करत तीही झोपी गेली. दिवस उजाडला रोजच्यासारखं ती उठून आपली काम करू लागली. मुलांना तयार करून शाळेत पाठवलं तितक्यात त्यांनी हाक मारली. ती त्याच्या जवळ आली… काय हो काय झाले असे तिने विचारले . अग आज मला खूप अस्वस्थ वाटते ग असं तो म्हणू लागले. मला श्वास घ्यायला त्रास होतोय ग मला खूप बेचैनी होत आहे. आज माझं काही खरं नाही असं तो तिला म्हणू लागले . ती समजावत होती असं काहीच होणार नाही. तुम्ही शांत झोपा मी डॉक्टरांना बोलावते . तिने फोन करून डॉक्टरांना बोलावून घेतले डॉक्टरांनी चेक करताच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल असं सांगितले. ति लगेच आपल्या पतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली त्याच्यावर उपचार चालू झाले. श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्याला ऑक्सिजन लावण्यात आले. तिला काही सुचत नव्हतं . ती फक्त देवाची याचना करत होती पण नियतीपुढे कोणाचं कधी चालतं का ? त्यांना खूप वेदना होऊ लागल्या वेदनेने विव्हाळत होते अगदी…! तिला जवळ बोलावले तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाले. अगं आता माझा मृत्यू जवळ येत आहे, पण तू खचू नकोस आपल्या मुलांना नीट सांभाळ. त्यांचे हे बोलणे ऐकताच तिच्या काळजात धसकन काहीस व्हाव असं होऊ लागलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ती त्यांना कुरवाळत होती. त्यांचं मरण ती समोर बघत होती. पण त्यावरती काहीच करू शकत नव्हती. वेदना वाढू लागल्या…
श्वास घेणं आता जमत नव्हतं हळूहळू ते मृत्यूच्या दारात जात होते. त्यांनी तिला शेवटचं न्याहाळलं, हात हातात घेऊन टक लावून तिच्याकडे पाहू लागले. काही क्षणात त्यांची प्राणज्योत मावळली. तिला काहीच सुचेना तिने मोठ्याने हंबरडा फोडून धाय मोकळून रडू लागली.
एक मोठा अध्याय संपला होता आणि दुसरा सुरू झाला होता…आत्ता पर्यंत त्यांच्या सोबतीने त्यांच्या पंखाखाली रहायची सवय झालेली, जगाचा काहीच अनुभव नसलेली ती…
पण काही दिवसांत उभी राहिली ठाम पणे…
स्वतःच्या शिक्षणाचा कधी वापर केला नव्हता पण आज वेळ आलेली, आज ती पहाटे उठून दोन्ही मुलांचा डब्बा बनवून, सगळं आवरून ऑफिसमध्ये जात होती. घरी आल्यावर मुलांचा अभ्यास, त्यांचे खेळ सारं काही सांभाळून आज आयुष्याच्या या टप्प्यावर ती पोहोचली होती…!
त्यांच्या फोटो समोर बसून स्वतःच्याच जीवनपटाकडे पाहताना तिला सारं काही एखाद्या चित्रपटा प्रमाणे तरळुन जात होतं…!
डोळयातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या त्या हळूच पुसत तिची दोन्ही मुल आज तिच्या कुशीत रडत होती…!
रूपाली राऊत….
बोईसर, पालघर

