बुक शेल्फ मधील कुठलेतरी पुस्तक शोधताना अमनच्या हाती त्याच्या पत्नीची, प्रितीची डायरी लागली.तो मनात पुटपुटला – ही तर प्रितीची डायरी आहे.काय लिहित असावी ती यात?मला तर वाटतं ती किराण्याचा हिशोब,कुठली भाजी आणायची या सगळ्यांचा हिशोब लिहित असणार.त्याने सहजच प्रितीची डायरी उघडून पाहिली.डायरीच्या पहिल्या पानावर सुंदर अक्षरांत एक सुंदरशी कविता लिहिलेली होती.कवितेचे शीर्षक होते -‘ स्त्रीच्या मनाची व्यथा ‘.त्याने पूर्ण कविता वाचली.तो जसजसा पुढील कविता वाचत होता तसतसा आश्चर्यचकित होत होता.त्याने जवळपास पाच -सहा कविता वाचल्या.प्रत्येक कवितेत स्त्रीचे दु:ख, तिच्या वेदना,तिचा मान -अपमान याचेच वर्णन केले होते.त्या कविता वाचून अमन स्तब्ध झाला.त्याने कधी विचारही केला नव्हता की प्रिती कविता लिहित असेल.तो विचार करायला लागला -प्रितीच्या मनात इतकी व्यथा लपलेली आहे,एक- एक शब्द तिच्या मनातील भावना स्पष्ट करतो आहे.मी तर तिला कधी समजून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.तिच्यात इतकी प्रतिभा असेल असे कधीच वाटले नव्हते.जेव्हा पण ती डायरी घेऊन बसायची तेव्हा मला वाटायचे की ती काही हिशोब वगैरे लिहित आहे.
प्रितीचा कविता लिहिण्याचा छंद पाहून अमनला तिच्याबद्दल थोडा अभिमान वाटला.एरवी तो प्रितीला घालून -पाडून बोलत असे.कारण प्रिती साधी गृहिणी होती.त्यामुळे अधिक पैसे मिळवण्यासाठी प्रितीने कुठेतरी नोकरी करावी असे अमनला वाटे.परंतु घरी अमनच्या आजारी आई-वडिलांकडे प्रितीला लक्ष्य द्यावे लागत असे.शिवाय प्रितीला तिच्या पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाकडेही बघावे लागत असे.अमन आपल्याच विचारात गर्क झाला – प्रितीने आजपर्यंत कधीच सांगितले नाही की ती इतक्या सुंदर कविता करते.तिने सांगितले नाही याला कदाचित मीच जबाबदार आहे.मी कधी जाणण्याचा प्रयत्नच केला नाही की ती डायरीत काय लिहिते आहे.मी नेहमीच तिला साधी गृहिणी समजत आलो.
इतक्यात प्रिती अमनला जेवणासाठी आवाज द्यायला रूममध्ये आली.”तू इथे काय करतोय? मी तुला घरभर शोधते आहे आणि तू इथे बसला आहेस.जेवायला चल.” अमनने प्रितीच्या डोळ्यांत पाहिले.दिवसरात्र कामाच्या व्यापात गुंतल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता.प्रितीला अमनच्या हातात आपली डायरी दिसली.प्रिती अमनला म्हणाली-” तू माझी डायरी वाचलीस का?”प्रितीने आपली डायरी लगेच अमनच्या हातून घेतली.अमन तिला म्हणाला- “तू इतक्या सुंदर कविता करतेस मला माहित नव्हते.तू मला कधी बोलली का नाहीस? ” प्रिती अमनला म्हणाली- “याचा अर्थ तू माझी डायरी वाचलीस.” अमन तिला म्हणाला- “पूर्ण डायरी तर नाही वाचली,पण काही कविता जरूर वाचल्या.प्रत्येक कवितेत तुझ्या अंतर्मनाची कविता दडलेली आहे.आतून तू इतकी दु: खी असताना चेह-यावर नेहमी हास्य कसे ठेवतेस?” यावर प्रिती म्हणाली-“जर मी हसतमुख नाही राहिले तर माझ्यासाठी जगणे कठीण होईल.तुझ्यासाठी, आपल्या मुलासाठी,आई-बाबांसाठी मला सदैव हसतमुख राहायलाच हवे.मला माहित आहे की तुला मी नोकरी करावी असे वाटते.पण तूच सांग की मला घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून शक्य होईल का?जर तुला ऑफिसमधून आल्यावर गरमागरम चहा- नाश्ता मिळाला नाही तर तुला आवडेल का? नाही ना.” अमन प्रितीला म्हणाला-“तू मला तुझी व्यथा,तुझा त्रास कधीच सांगितला नाहीस.” ” तू कधीतरी मला विचारलेस का? ऑफिसमधून आला की पेपर वाचत बसतोस.माझ्यासाठी तुझ्याकडे वेळच कुठे असतो?”
प्रितीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.अमनला त्याची चूक उशीरा का होईना लक्षात आली होती.त्याने प्रितीची त्याच्या वाईट वागण्याबद्दल माफी मागितली.त्याने हळूच प्रितीला जवळ घेऊन तिच्या कपाळावर एक चुंबन दिले.प्रितीला आज तिला हवंहवंसं वाटणारं प्रेम आज इतक्या दिवसांनी परत मिळाल्याचा आनंद झाला होता.ती अमनच्या बाहूपाशात विसावली.जणू आज परत एकदा त्यांच्या ख- या प्रेमाची सुरुवात झाली होती.
लेखिका – लैलेशा भुरे
नागपूर

