
आजचा लेख साने गुरुजी दि.4.8.24
साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी, कोकणातील पालगड या गावी झाला. त्यांचे घराणे हे खोत घराणे. साने गुरुजींच्या जन्माच्या आधी त्यांचे घराणे वैभव संपन्न- श्रीमंत समजले जात असे, पण नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती घसरत गेली. त्यांचे घरही जप्त झाले आणि मग नंतर ते कर्जबाजारी झाले. गुरुजींच्या शिक्षणासाठीही त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते. त्यांनी शिक्षणासाठी खडतर हाल अपेष्टा सहन केल्या. त्यांनी माधुकरी मागून शिळे पाके तुकडे खाऊन किंवा काकडी खाऊन आपले दिवस काढले. अशा खडतर हाल अपेष्टातच ते मॅट्रिक झाले आणि पुढेचे एम.ए पर्यंतचे शिक्षण त्यांनी त्रास काढतच पूर्ण केले.
गुरुजींच्या आईचे नाव यशोदा ते आपल्या आईवर खूपच प्रेम करत. त्यांच्या आईने त्यांच्यावर लहानपणी विविध संस्कार केले त्यातूनच त्यांचा जीवन विकास झाला. गुरुजी भावनाप्रधान आणि संस्कारक्षम होते. त्यांच्या आईने त्यांचे कडून पाढे, स्तोत्र, श्लोक हे सगळे खूप छान पाठ करून घेतले होते. ते कविताही करत असे.
शिक्षण झाल्यावर अमळनेर येथील शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी ते आपले श्रम आणि बुद्धि पणाला लावीत असे. नंतर 1930 मध्ये राजकीय आंदोलनात सहभागी होऊन सत्याग्रहात भाग घेतला त्यासाठी ते तुरुंगातही गेले होते. स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत ते भूमिगतही झाले होते. गांधीजींच्या प्रभावामुळे ते खादीचे कपडे घालत असे
गुरुजींनी विपुल वांग्मय लिहिले आहे. कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध कविता नाट्यसंवाद इत्यादी, त्यांच्या विचारांचे, भावनांचे कल्लोळ त्यांनी लेखणी द्वारे प्रकट केले होते. त्यांचे गाजलेले पुस्तक श्यामची आई हे त्यांनी आईवर लिहिलेले पुस्तक खूप सुंदर आहे. तुरुंगात असताना त्यांनी रात्री जागवून हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक घरोघरी जाऊन त्याच्या 44 आवृत्ती निघाल्या. मुलांना संस्कार देणाऱ्या या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी चित्रपटही काढला होता
लेखिका – रेखा डायस
गोवा














