आजचा लेख – स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…
पूर्वीचा काळ लक्षात घेतले तर असे आपल्याला म्हणता येईल की, त्यावेळी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती.परंतु अलीकडे आपल्याला तिचे महत्व कमी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे आणि तिची जागा आज विभक्त किंवा केंद्र कुटुंब पद्धतीने घेतली आहे…आज समाजात माणूस हा आपली माणुसकी झपाट्याने विसरत चालला आहे.आणि भरदिवसा भरस्त्यात आज स्त्रीची अब्रू वेशीवर टांगल्या जात आहे.एक इथे तर उद्या तिथे अशा रोजच घटना घडत आहेत.तिला योग्य न्याय कधीच मिळत नाही.
स्त्री जन्माची कहाणी अशी आहे की,तिच्या दुःखाने तिची वाणी नेहमीच भिजलेली असते.आणि तिची ही दुःखद कहाणी ऐकायला कोणीच तयार नसतात.उलट कोणीही तिची चूक दाखविण्याचा प्रयत्न करतात.एकीकडे भारतीय संस्कृतीत तिला महत्वाचे स्थान आहे असे समजले जाते तर प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र आपल्याला पहावयास मिळते.ती जन्माला येवून कोणता पाप केला आहे.आणि आपण जर लक्षात घेतले तर तिच्याशिवाय माय बाप बनू शकत नाही.मग असे असताना आपण तिलाच का शाप द्यावा.आणि म्हणूनच म्हणावे लागेल की किती तिचा जीव निष्पाप आहे.कधी कधी तर आपल्याला आपल्या समाजात मायेचा गळा बापाने दाबून तिचा जीव घेतल्याचे अनेक उदाहरण आपल्या नजरेसमोर येतात.दुसरे असे की जन्माला येण्यापूर्वीच तिचा जीव गर्भातच मारून देवाच्या दरबारी परत पाठविले जाते.
तेव्हा असे वाटते की,असा का गुन्हा तिने केला असावा.एकीकडे आपण म्हणतो की,मुलगी म्हणजे एक संस्कृतीचा धडा.घरच्या लक्ष्मीचा भरलेला घडा.आणि तिलाच असते एकंदरीत ममतेचा ओढा.आतातरी विचार करा असे जर नेहमीच घडत असले तर मी जगात यापलीकडे दिसणार नाही.मला जर तुम्ही स्त्रीलाच मारून टाकले तर आई बहीण बायको कोठून शोधणार ?
आज आपण २१ व्या शतकात आधार पण केले असून भारतीय संविधानात स्त्रियांनी पुरुष यांना समानतेचे हक्क मिळवून दिले आहे तरी आज स्त्रियांवर अन्याय अत्याचार बलात्कार अशा घटना घटना घडतच असतात हा तर मानवी जीवनाला लागलेला एक कलंक आहे. तिचे स्वतंत्र जीवन आहे तिला मोकळेपणे जीवन जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.मग समाजात असे का घडावे ? याचे एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे वासनांध व्यक्ती.तेव्हा स्त्रीने स्वतः ला कमजोर न समजता लढा देण्याची आवश्यकता आहे.शेवटी तर असा एक प्रश्न निर्माण होतो की,माणसा माणसा कधी होशील रे तू माणूस.तिचा आक्रोश होताना आपण पाहिले आहे.तेव्हा स्त्री मनातील भावना तिच्या वेदना कधी समजून घेण्याचा प्रयत्न करशील ?
आई बाबांनी तिला जन्म दिला, त्यांनी आपल्या जीवनात अनेक कष्ट उपसून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपले.आणि आजच्या समाजव्यवस्थेत चालत असलेल्या अनिष्ट प्रथेंनी निष्पाप मुलींचा जीव गमवावा लागतो.तिचे फुलात रूपांतर होण्याच्या आधीच कुस्करून टाकल्या जाते.याला जबाबदार कोण ? ती वासनांध व्यक्ती की जिला वासनेने झपाटून टाकले आहे.तेव्हा दोन हात करण्याची आपल्यात हिम्मत असावी आणि या समाजाला दाखवून द्यावे की,आम्ही कोणत्याच क्षेत्रात मागे किंवा कमजोर नाही.तेव्हाच या वर्गाला चपराक निश्चितच बसेल.
या विश्वात नारी शक्ती सर्वात महान समजली जाते तेव्हा कुठे गेली तुमची महानता?आज किती सन्मान होत आहे स्त्री जातीचा ?तिला केव्हा सुरक्षितता मिळणार ? यात तिचा काय गुन्हा आहे? गुन्हा आहे तो फक्त आणि फक्त मानवी वाईट कृत्याचा.आपल्यातील सर्व राक्षसी विकृत विचार बाजूला काढून ठेवा आणि तिला सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा नक्कीच प्रयत्न करा.त्यासाठी आम्ही सर्व एक आणि समान आहोत ही भावना सर्वांच्या मनात रूजली पाहिजेत.
आज संपूर्ण जगात अन्याय अत्याचार स्त्रियांवर लहान मुलींवर होणारे बलात्कार या सर्व विकृत रूपाने सर्व जग बोकाळले आहे.तेव्हा आपल्या जीवनात माणुसकीचा धर्म पाळून सर्वांनी एकतेची आणि समानतेची वागणूक द्यावी.आणि अलीकडे होत असलेले अनिष्ट प्रकार इथेच थांबवावे. समाजात जीवन जगताना नैतिकतेचे पालन केले पाहिजे.एकमेकांना समजून घेतले पाहिजे.तेव्हा तेव्हा आपल्या जीवनात आपल्याला समाधान मिळते.आणि असे करीत असताना आपल्या आयुष्यात चांगल्या कर्माचा ध्यास कर.एवढेच नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न कर.आणि आपल्या मनातील अहंकाराला पूर्णपणे तिलांजली दे.आणि सर्वांशी मैत्रीभावाने जीवन जगण्याची आस धर.मग बघ तू कसा माणूस होत नाही ते माणसाने माणसाला माणूस म्हणून ओळखावे.नुसते माणूस म्हणून नाही तर त्यासोबत माणुसकी जपणारी माणसे ओळखावीत. तेव्हा माणूस बनून माणसासोबत सगळे माणुसकी जपण्याचा नक्कीच प्रयत्न करा.
लेखक : प्रा.नानाजी रामटेके
कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय,वासाळा ( ठाणेगांव ) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली

