prabodhini news logo
Home लेख आजचा लेख – “गोड साखरेची कडू कहाणी”

आजचा लेख – “गोड साखरेची कडू कहाणी”

0
423

उसाचा गोडवा जगाला भावला,
बैलांचा घाम कधी कुणी पाहला?
चाबकाचा फटका झेलूनी अंगावर
असह्य ओझ्याचा भार वाहीला

वरील शब्दांतून आपल्याला बैलांच्या मनातील व्यथा वेदना दिसून येते.गोड उसापासून साखर बनवण्याची प्रक्रिया एकीकडे आर्थिक विकासाला चालना देणारी आहे, तर दुसरीकडे ही प्रक्रिया मजुरांच्या खडतर प्रवासाची तसेच प्राण्यांच्या होणारे शोषणाची कथा उलगडते.

साखर कारखाने सध्या सर्वत्र सुरू झाली आहेत. दैनंदिन जीवनात आपण खात असलेली साखर जितकी गोड लागते, तितकाच शेतातील ऊस तोडण्यापासून तर कारखान्यात उस पोहाचविणे, म्हणजेच साखर तयार होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कडू प्रवास असे आपल्याला म्हणता येईल. थंडीचे दिवस सुरू झाले आहे आणि त्यातच ऊस तोडण्यासाठी मजुरांना थंडी गारठ्यात पहाटेत जावे लागते, त्यासोबतच त्यांच्या बैलांनाही जावे लागते. भल्या पहाटे उठून ऊस तोडणी मजूर आपल्या पत्नीसह शेतात जातात. ऊस तोडून बैलगाड्या मध्ये ऊस भरतात, मानेवरील इतक्या ओझ्यामुळे बैलांना चालणेदेखील अशक्य होते. क्षमतेपेक्षा जास्त ओझे व प्रवास,वरून चाबकाचे फटके यामुळे बैलांची दमछाक होते. त्यांच्या तोंडातून फेस निघतो. दिवाळीनंतर हा जो प्रवास सुरू होतो तो एप्रिल महिना अखेरपर्यंत सुरू राहतो. म्हणजेच ऊस तोडणी मजूर आणि बैलांना थंडीच्या तडाख्यापासून ते उन्हाचा तडाख्या पर्यंतचा हा प्रवास सहन करावा लागतो. हे सर्व या दोघांच्याही दृष्टीने अत्यंत कष्टदायक प्रवास असेच म्हणावे लागेल.

दोऱ्या न बांधला गळा कसा रे?
ओढत गाडा पण शब्द कुठ रे
डोळ्यात दोघांच्याही अश्रू साठले,
रात दिन कष्ट करूनही दैव फाटले.

मजुरांना स्वतःसाठी तसेच प्राण्यांसाठी देखील योग्य आहार पोषण याकडे लक्ष देता येत नाही. कित्येकदा अतिश्रमामुळे मारहाणीमुळे बैलांचे आरोग्य बिघडते. मजूर वर्गाची ही कंबरदुखी श्वसनाचे आजार, मणक्याचे आजार,त्वचेचे आजार असे समस्या उद्भवतात. मजूरवर्ग आपले गाव सोडून तात्पुरते साखर कारखाना परिसरात स्थलांतरित होऊन आलेले असतात. म्हणून नवीन ठिकाणी त्यांना अपमान व अवहेलना देखील सहन करावी लागते. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर देखील परिणाम होऊ शकतो. ऊस तोडणी कामगारांची मुले कधी कधी गावाकडे आजी आजोबांसोबत राहत असतील, तरी देखील आई-वडिलां पासून लांब राहिल्याने त्यांचे शिक्षणात मन लागत नाही. तसेच आपल्या आई-वडिलांसोबत ऊस तोडणीसाठी आलेली असतील अशा मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. कित्येकदा वही पेन हातात धरण्याच्या वयात या मुलांच्या हातात चाबुक सुद्धा दिसून येतो.
वाचकहो,सध्या अनेक ठिकाणी ट्रॅक्टर द्वारे देखील ऊस वाहतूक सुरू झालेली आपल्याला दिसते, ट्रॅक्टर द्वारे होणारी ऊस वाहतुकीचे प्रमाण फार कमी आहे.आपण सर्वच क्षेत्रात प्रगती केलेली दिसून परंतु ऊस तोडणी मजूर वर्ग यांच्या जीवनमानात कुठलेही बदल घडून आलेले आपल्याला दिसून येत नाही. तसेच प्राण्यांचे होत असलेले शोषण हा ही मुद्दा नजरेआड ठेवून चालणार नाही. गोड साखरेची कहाणी देखील खऱ्या अर्थाने तितकीच गोड व्हायला हवी असे मला वाटते. समाजिक हिताच्या दृष्टीने हा एक चिंतनाचा विषय आहे.

एक दिवस येईल न्यायाची पहाट,
कष्टाची फेड होईल नक्की कधीतरी,
बैल जोडी व मालकाला मिळेल का विश्रांती?
हाच प्रश्न येई रात्रंदिन मनी.

आपण सर्व मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करू शकतो हे नक्की कळवा..

लेखिका सौ. पल्लवी संजय आल्हाट
अध्यक्ष प्रेरणा बहुउद्देशीय फाउंडेशन,
प्राणी व पक्षी प्रेमी
श्रीरामपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here