प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. चांगल्या वाईट..आनंद देणाऱ्या , दुःखात बुडवणाऱ्या कधी आपण सुखात असतो तर कधी दुःखात असतो. आपण दुःखात असतो तेव्हा असे का घडले याचे आपण कारण शोधतो.उगाच दुसऱ्याला किंवा आपल्या नशिबाला दोष देतो.पण खरे तर कुठेतरी. आपलीच चुक असते.कारण जीवन कसे जगायचे , जीवनात काय करायचे हे आपणच ठरवायचे असते कारण बऱ्यावाईट परिणामांना आपल्यालाच सामोरे जायचे असते. म्हणूनच म्हणतात, “तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार “
लहानपणी आईवडील सगळे आपल्यासाठी ठरवत असतात.ते आपली काळजी घेतात.जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे असते..आपले जीवन घडवायचे असते.जसे निर्णय आपण घेऊ तसेच फळ मिळते.जीवन जगत असताना जगण्याचा जो मार्ग आपण स्विकारतो त्या मार्गावरचे सर्व अडथळे, सर्व संकटे यांना आपल्याला तोंड द्यावेच लागते.
जसे की दोन वाटा आहेत एक वाट उद्यानाकडे जाते व एक वाट जंगलाच्या दिशेने जाते आपण पहिली वाट निवडली तर उद्यानात पोहोचणार व दुसरी वाट निवडली तर जंगलात पोहोचणार..शिकत असताना चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क मिळतात.अभ्यास नाहीच केला तर नापास होतो.चांगले करीयर करायचे असेल तर चांगला अभ्यास करावा लागतो.. पुन्हा चांगली नोकरी मिळाली तरी बढतीसाठी प्रयत्न करावे लागतात.कष्ट करावे लागतात.
कष्टाशिवाय काहीही साध्य होत नाही..प्रयत्नाशीवाय काहीही मिळत नाही. अगदी मिळालेच तरी ते टिकवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.आयते मिळाले तरी ते सांभाळणे ,अजून वाढवणे, पुढच्या पिढीसाठी जतन करणे कष्टसाध्यच असते.एकुण काय ‘प्रयत्नांती परमेश्वर ‘म्हणतात तेच खरे.
प्रत्येक माणूस स्वप्ने पाहतो.स्वप्नांसाठी जगतो.पण नुसती स्वप्नें पाहिली म्हणून ती थोडीच साकार होतात.ती साकार करण्यासाठी कष्ट करावे लागतात योजना आखाव्या लागतात.स्वप्नपुर्तीसाठी धडपड करावी लागते.तेव्हा कुठे ती साकार होतात.अगदीच सगळीच नसली तरी काही साकार होतात.
ध्येयपूर्तीसाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो.नुसता देवावर विसंबून राहात नाही.. किंवा पायावर पाय टाकून बसत नाही.. थोरामोठ्यांची आत्मचरित्रं वाचली तर कळते की काय काय दिव्यातून पार पडल्यानंतर त्यांना हे मोठेपण प्राप्त झालेआहे.बाबा आमटे, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गौतम बुद्ध, सावित्री बाई फुले, अशी अनेक माणसे जी समाजासाठी सतत प्रयत्नरत राहिली.अजरामर झाली.
अगदी साधी समाजात मान्यता असलेली, किंवा साध्या सुध्या जीवनात यशस्वी झालेली माणसे पाहिली तरीही त्यांच्या यशामागे त्यांचे अपार कष्ट असतात.त्यांनी आपले जीवन घडविलेले असते.
तेच त्यांच्या जीवनाचे शिल्पकार असतात.
लेखिका गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

