मांजाने गळा चिरल्याने पोलिसाचा मृत्यू

0
264

मुंबई प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज

मुंबई: कर्तव्य बजावून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पोलिसाचा मांजाने गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकोला परिसरात घडली. या विचित्र अपघातामध्ये कॉन्स्टेबल समीर जाधव यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये कुटूंबीयांसोबत वास्तव्यास असलेले समीर जाधव दिंडोशी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून नेमणुकीला होते. जाधव रविवारी दुपारी काम आटोपून दुचाकीवर घरी परतत होते. वाकोला पुलावरून जात असताना अचानक त्यांच्या समोर पतंगाचा मांजा आला. मांजा वाचविण्याच्या प्रयत्नात असताना या धारधार मांजाने त्यांचा गळा चिरला. गळ्यातून रक्त येत असल्याचे पाहून स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात ते दुचाकीवरून खाली पडले. हा प्रकार एका वाहनचालकाने पाहिला. काही अंतरावर गस्तीवर असलेल्या खेरवाडी पोलिसांना माहिती दिली.

खेरवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर अवस्थेत पडलेल्या जाधव यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या खिशातील ओळखपत्रामुळे त्यांची ओळख पटली. ते पोलीस दलात असल्याचे समजल्यावर दिंडोशी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने वरळी बीडीडी चाळीवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणात अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here