खाऊन खाऊन फुगली झाला माह्या फुगा
लोक म्हनते पहिले करा जरूकसा योगा
हजारो रूपये खर्चिसन लावला मं योगा कलास
कपडे चटई गाडीची खरेदी झाली झकास…
काया गागल डोयावर मी ऐटीत लावते
बिच्चारी गाडी माही कुथत कुथत पयते!
ओम म्हनता म्हनताज माह्यावाला असा अडकला श्वास
अन जबडा माह्या अडकला पुरा दोन तास
एका बाईन केलं उभं मले अन् एकीन केलं उपडं
मोठ्या मुश्किलीने बंद झाल मं माह्यवाल जबडं!!
रामदेव बाबाचं पोट पाहीसन आनंद गगनात मायेना
काही केल तरी माह्य पोट काही तसं हालेना
मांडी मारून बश्याची आमची पंचाईत भली
मंग उठून उभ कराले सगळी फौज धावत आली
मंग कसातरी मुश्किलीने पाय घालला गळ्यात
बापरे,अस वाटे हत्तीच फसला छोट्या तळ्यात!
लोम करताना नाकपुडीन श्वास गेला आत
पन अनुलोम करताना सर्दीन गह्यरा केला अकात!!
योगा कलासला गेली मी लठ्ठपना झाक्याले
पन काय करू बहीन शरीर माह्य तयारच नी वाक्याले
म्हनूनच म्हनते खान्यावर आतातरी ठेवा ताबा
नाहीत भर जवानीत लोक म्हनतीन
या.. आजी..! या आबा!!
या…आजी..! या आबा!!
कवियत्री – माधुरी चौधरी वाघुळदे
संभाजीनगर

