लेख – आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं का?

0
209

आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं का? हा नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.आपण इंग्रजांच्या ब्रिटिश राजवटीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालो खरे,पण मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालेलो नाही.आपल्या देशात आजही जातीधर्माचे खेळ चालतात.येथे अनेकदा विविध माणसांच्या जाती एकमेकांवर सूड उगवतात.रक्तपात घडवतात.आज माणसे धर्माच्या भिंतीत हरवले आहेत.कोपलेल्यांच्या संगतीत राहून भरकटत चाललेत.देवसुध्दा आता जातीधर्माच्या रंगात रंगले आहेत.मान्य की आज आपण खूप प्रगत झालो आहोत.आपण आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो, त्याला इंग्रजीतून शिक्षण देतो.पण अशावेळी आपल्या मातृभाषेचे काय?त्याला मराठी लिहिणे तर सोडाच, साधं मराठी वाचताही येत नाही.ही परिस्थिती सगळ्यांची आहे असं मी म्हणणार नाही.परंतु अनेक पालकांची हीच तक्रार असते.असे स्वातंत्र्य आपल्याला अपेक्षित आहे का? नक्कीच नाही.इंग्रजी भाषा येणं आज जितकं महत्त्वाचं आहे तितकेच आपली मातृभाषा बोलणं, लिहिणं आणि वाचणं महत्वाचे आहे.
सध्या राजकारण शिगेला पोहोचलं आहे.आज प्रत्येकजण आपला फायदा कशात आहे याचाच विचार करतो.राजकारणी मंडळी काही घटना घडल्या की त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असतात.लोकांच्या भल्याची चिंता आता फारशी कुणाला उरली नाही.काही लोक तर राजकारण्यांचे गुलामच झाले आहेत.सामान्य जनता आज महागाई, भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुरफटलेली आहे.इंग्रजांच्या राजवटीतही जनता त्रस्त होती.भारतीय लोकांवर इंग्रजांनी आतोनात अत्याचार केला.इंग्रजांच्या येण्याआधी जनता राजांची गुलामी करीत होती.नंतर इंग्रजांची केली आणि आता राजकीय नेत्यांची करीत आहोत. इतक्या संघर्षाने मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राहणे खूप महत्त्वाचे आहे.आज काही लोक आपल्या देशाचे तुकडे करण्याच्या बेतात आहेत.का असे आपल्याच देशाचे लचके तोडायला निघालेत काही लोक?हे कसले स्वातंत्र्य मागताहेत? व्यक्तिस्वातंत्र्य असलं तरी अवाजव आणि चुकीच्या मागण्या करणं बरोबर नाही.आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उभे आहेत.त्यांचाही विचार व्हायला हवा.स्वातंत्र मिळालं तरी ते उपभोगता यायला हवं.आपल्याकडे होणा-या निवडणूकांमध्ये आतोनात पैसा खर्च केल्या जातो.अनेकदा पैसे देऊन,इतर आमिष दाखवून, दमदाटी करून किंवा मारहाण करून एखाद्या खास व्यक्तीलाच मत देण्याबाबत सांगितले जाते.हे स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना.ही खरी आजच्या स्वातंत्र्याची शोकांतिका आहे.
देशात जे काही चालले त्याचे मला काय करायचे असा विचार लोक करीत असतात.प्रत्येकाला फक्त स्वतःची प्रगती महत्त्वाची वाटते.समाजात काय चालले आहे याचे कुणालाही काहीही पडले नसते.जर हुतात्म्यांनी असा विचार केला असता तर आपला देश कधीच स्वतंत्र झाला नसता.महिला आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.असे असले तरी महिलांवर होणारे अत्याचार थांबले आहेत का?कित्येक वासनांध पुरूषांच्या नजरा मुली, महिलांना संपवू पाहत आहेत.आता खरंच विचार व्हावा की हे स्वातंत्र्य आहे का?हे कुठेतरी थांबायला पाहिजे.ख-या अर्थाने स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा माणसातली माणुसकी जागी होईल.

लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here