मला आईने दिलेले
माझा देह, माझे मन
ऋण मातृत्वाचे, माय
कसे करू मी वर्णन !
माय जगली कष्टात
आम्हासाठी दिनरात
तिला आरामच जणू
नाही मिळाला जन्मात!
ओढ शिकण्याची जरी
नाही मिळाले शिकाया
घरी आणलेले मासे
तिला लागले विकाया!
घरदार सांभाळूनी
शिस्त आम्हास लावली
थोर आकांक्षेने मला
वाट शाळेची दावली!
तिचे वागणे ते साधे
मन आनंदून जावे
स्पर्श मायेचा असा की
वाटे पुन्हा सान व्हावे!
माय सांगायची मला
‘बन माणूस तू मोठा,
घेऊ नको जगताना
कधी मुखवटा खोटा!’
कवी – महादेव भोकरे
वडूज, सातारा

