माझा सुंदर बाप्पा
माझा सुंदर बाप्पा हा
आला वाजत गाजत
ढोल ताश्यांचा सुस्वर
बघा गुंजतो कानात… 1
नको फोडा रे फटाके
होतो वायू प्रदूषण
आवाजाच्या नादापायी
विचलीत होई मन….2
सजावटीसाठी छान
झाडे हिरवे हिरवे
प्रदूषण मुक्त ठेवू
घेऊ संकल्प हे नवे….3
घरी आणू स्थापनेला
मुर्ती ही शाडू मातीची
विसर्जन पाण्यामध्ये
घरोघरी पुजनाची…4
पर्यावरणाची रक्षा
ठेवू मनी एक ध्यास
अंधश्रद्धा दूर सारू
सदा मनात विश्वास….5
एकवीस मोदकाचा
ताट प्रसादा सजवू
दूर्वा जास्वंदी फुलांचा
हार गणेशा चढवू…6
खुश होई माझा बाप्पा
नको हा झगमगाट
पूजू श्रद्धेने गणेशा
दरवर्षी त्याचा थाट…7
गुलालाची उधळण
भक्ती भाव तया वाहू
सुखकर्ता वक्रतुंड
रूप गणेशाचे पाहू… 8
आरतीला देऊ छान
टाळ चिपळ्यांचा साद
गुणगान स्तुती करू
भक्ता भजनांना नाद..9
घालू जागर एकीने
भाव भक्तीचा सोहळा
एकात्मता बाळगून
फुले आनंदाचा मळा…10
कवयित्री हर्षा भुरे,भंडारा

