prabodhini news logo
Home नागपूर आजचा लेख – तुझं तुलाच जगायचं आहे

आजचा लेख – तुझं तुलाच जगायचं आहे

0
397

आजचा लेख – तुझं तुलाच जगायचं आहे

आपण नेहमीच स्त्री-पुरूष समानतेच्या गोष्टी करत असतो.पण आजही स्त्रियांना त्यांच्या मनाजोगे कपडे घालता येतात का?याचे उत्तर नाही असे आहे.यात स्त्रियांची काहीच चूक नाही.आजही आपल्या समाजाची मानसिकता बदललेली नाही हेच यातून दिसून येतं.आजही समाज स्त्रियांना भारतीय वेशभूषेत पाहणे पसंत करतो.आपण एकवीसाव्या शतकात असलो तरी महिलांना त्यांच्या पसंतीचे कपडे घालण्याला अजूनही मज्जाव केला जातो ही खरी परिस्थिती आहे.एखाद्या मुलीने किंवा महिलेने घट्ट जिन्स घातली की ही जरा जास्तच माॅडर्न आहे किंवा ही जरा थिल्लर असणार असा ठपका समाज तिच्यावर ठेवत असतो.असे करणे म्हणजे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे अशी एक ठाम समजूत समाजाची असते.अशा मुली किंवा स्त्रिया संस्कारशील नसतात अशी मते समाज त्यांच्याबद्दल निर्माण करीत असतो.कितीतरी मुली अंगभर कपडे घालूनही असंस्कारी असतात. त्यामुळे कपड्यांवरून तरी मुलीचे संस्कार दिसत नाही.स्त्रियांना नटण्याची मुळातच हौस असते.त्यात त्यांच्या आवडीचे कपडे त्यांनी घातले तर बिघडलं कुठे? कितीतरी पुरूष आपल्या घरातील बहिणीला, बायकोला, मुलीला सांगत असतात की त्यांनी अमूकच कपडे घातले पाहिजे.खरंतर ते त्या स्त्रियांना आपली हौसमौज बाजूला ठेवण्यासाठी सांगत असतात.लोकांच्या नजरा किती वाईट असतात असेच ते पुरूष आपल्या घरातील महिलांना सांगत असतात.एक प्रकारे ते स्त्रियांना सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे आयुष्य जगायला भाग पाडत असतात.खरंच त्या महिला अंगभर कपडे घालून सुरक्षित असतात का? एक उदाहरण द्यायचे झाले तर अंगभर कपडे घालणा-या लहान लहान मुलींवर देखील बलात्कार केला जातो.इथे कपडे जवाबदार नाही तर पुरूषांची स्त्रिला उपभोगाची वस्तू समजण्याची मानसिकता जवाबदार आहे.यावर मुलींनी माॅडर्न कपडे घालण्याचा काही संबंध नाही.ज्या पुरूषाचा हेतूच वाईट असतो तो अंगभर कपडे घालणा-या स्त्रियांनाही वाईट नजरेनेच बघतो.सर्व स्त्रियांनी साड्या घातल्या पाहिजेत अशी समाजाची अपेक्षा असेल तर पुरूषांनीही धोतर, कुर्ता पायजामा असा पेहराव करायला काय हरकत आहे? अगदी साठ-सत्तर वयाच्या वृध्द महिलांवर सुध्दा बलात्काराच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचत असतो.या बायका कुठे या वयात शाॅर्ट्स किंवा जिन्स घालतात? आपल्याकडे तरी असे दिसून येत नाही.
संविधानाने प्रत्येकाला मुलभूत अधिकार दिलेले आहेत.मान्य की समाजात व्यभिचार वाढत चाललाय.पण याला फक्त स्त्रियांचे कपडे जवाबदार आहेत असे मुळीच नाही.आपल्याकडे बलात्कारासारख्या गुन्ह्यात कायदे तात्काळ न्याय देणारे नाहीत ही खंत आहे.त्यामुळेच अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत असतात.एकच सांगावसे वाटते की मुलीच्या कपड्यांवरून तिच्याबद्दल चुकीचे मत बनवू नये तर तिच्या आचार-विचारातून तिची पारख व्हावी.आजच्या आधुनिक युगात शारीरिक सौंदर्यालाही महत्त्व आहे.त्यामुळे स्त्रिया वेगवेगळ्या वेशभूषा करून आपले सौंदर्य वाढवत असतात.त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.स्त्रियांना त्यांच्यासाठी काय योग्य, अयोग्य याची जाण असते.त्यामुळे त्यांच्या मर्यादा त्यांना माहित आहेत.अर्थात योग्य प्रसंग, वेळ-काळ बघून स्त्रियांनी
आपले परिधान करावे हे मात्र नक्की.थोडक्यात वेळप्रसंगानुसार शोभेल असा पेहराव असावा.स्त्रिया, मुली जर शाॅर्ट्स व्यवस्थित कॅरी करत असतील तर इतरांना काही अधिकार नाही त्यांच्यावर आक्षेप घेण्याचा.सर्वांना आकर्षक दिसावं वाटतं.यात काही चूक नाही.म्हणून कपड्यांवरून एखाद्या स्त्रिचा स्वभाव चांगला किंवा वाईट असेल असा अंदाज लावणे चुकीचे आहे.प्रत्येकाचं आपलं जीवन आहे.कुणाच्याही जीवनात ढवळाढवळ करण्याचा अधिकार खरं तर कुणालाच नाही.कपडे छोटे आहेत का त्यापेक्षा मानसिकता छोटी असते.पूर्वीपेक्षा आपण आता प्रगत झालेलो आहोत.उगीचच मुलींना किंवा स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून लेबल लावण्याची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे.

लेखिका- लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here