आजची कविता – स्पर्श आठवांचा
माझ्या मनातल्या आठवणी
कधी वाऱ्यासारख्या मुक्त होतात
जुन्या विचारांच्या प्रेरणा घेऊन
त्या चक्क व्यक्त होतात…
माझ्याच अंगणातल्या
चाफ्याच्या झाडाखाली बसून
पुन्हा पुन्हा जाग्या होतात
चाफ्याचा हात हातात घेऊन…
आठवांचा स्पर्श किती नाजुक
आत्ता जोरात वारा येईल
पानांफुलांसकट मग
फांद्याच हलू लागतील …
झुकलेली फांदी पकडून मी
बिलगायचा प्रयत्न करते आठवांना
ओंजळीत पकडू पाहते
बालपणातील सुखद क्षणांना …
कसे बरें सांगायचे आठवांना
पुन्हा पुन्हा भेटू नका
कडु जहर स्पर्शही आहेत
उसवत राहतो त्यांचा टाका….
कवयित्री
गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

