लेक माझी गुणाची
आहे मोठया मनाची
करीत सगळ्यांची सेवा
ती प्रकाश अंगणाची।।
उजळून टाकते घर
तिचे चैतन्याचे रूप
लेक जन्मता घरात
येई मनास हुरूप।।
लेक असता घरात
येई उधाण मनाला
तोच सोनियाचा क्षण
भिडे आंनद गगनाला।।
लेक दोन्ही घरात लक्ष्मी
आहे खरा वंशाचा दिवा
लेक सौख्याचे चांदणे
नको करू तिचा कधी हेवा।।
लेक मायेचा अंगण
करी भावाचे रक्षण
तिच्या शिवाय वाटे
बघा सुने सुने अंगण।।
लेक असता घरात
सारा मिटेल अंधार
माझी लाडाची ही लेक
आहे ही सोज्वळ फार।।
कवियत्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

