जगण्यात येतो,
कधी काळोख दाट,
संपता संपत नाही,
संकटाचा घाट.
आयुष्य म्हणजे विविध रंगांनी रंगलेली एक सुंदर कॅनव्हास आहे, पण त्यावर काही काळोख्या रंगांचे डागही असतात. या डागांनाच आपण आयुष्यातील ‘बॅड पॅच’ म्हणतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक काळ असा येतो, जेव्हा सगळं चुकल्यासारखं वाटतं, परिस्थिती हाताबाहेर जाते, आणि आयुष्याला दिशा सापडेनाशी होते. अशा वेळेस माणसाला खंबीर राहून या कठीण काळाचा सामना करावा लागतो.
‘बॅड पॅच’ म्हणजे अपयश, निराशा, आणि दुःखांनी भरलेला काळ. कधी नोकरीतल्या अडचणींमुळे, कधी आर्थिक संकटांमुळे, तर कधी प्रियजनांना गमावल्यामुळे माणसाला जीवन नकोसं वाटतं. त्यावेळी असं वाटतं की, अंधार कधीही संपणार नाही, पण हा अंधारच माणसाला स्वतःची खरी ताकद शोधायला भाग पाडतो.
या वाईट काळात माणूस एकटं पडतो, त्याचे निर्णय चुकतात, आणि कधी कधी आत्मविश्वास गमावतो. पण ‘बॅड पॅच’ म्हणजे काही शेवट नाही; तो फक्त एक फेज आहे. जसा दिवसामागून रात्र येते आणि पुन्हा नवा दिवस उजाडतो, तसंच या वाईट काळाचं स्वरूप असतं. अशा परिस्थितीत माणसाने संयम, धैर्य, आणि आशावाद सोडू नये.
वाईट काळ हे आयुष्याचं शिक्षण देणारे असतात. ते आपल्याला दाखवतात की आपण किती खंबीर आहोत आणि कोणत्या गोष्टींना खरं महत्त्व द्यायला हवं. अशा काळात आपल्या चुका सुधारण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची संधी मिळते. संकटं आपल्याला परिपक्व बनवतात आणि आयुष्याला नवीन अर्थ देतात.
आपण कितीही प्रयत्न केले तरी आयुष्यात ‘बॅड पॅच’ टाळता येणार नाही. पण त्या काळाचा सामना करायचं कसब मात्र आपण शिकू शकतो. त्या काळाने आपण मोडून न पडता त्यातून काहीतरी शिकलं, तर तो अनुभव आपल्यासाठी खूप मौल्यवान ठरतो. म्हणूनच वाईट काळाला जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानून पुढे जाणं गरजेचं आहे.
शेवटी, ‘बॅड पॅच’ आपल्याला शिकवतो की आयुष्याचं खरं सौंदर्य संकटं ओलांडून उभं राहण्यात आहे. अंधार कितीही गडद असला तरी त्याच्या पलीकडे असलेला प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो, आणि हेच आयुष्याचं खरं यश आहे.
ज्यांनी झेलली वादळ,
तेच होतात खंबीर,
संपते रात्र,
उगवतो नवा सविर.
लेखिका सौ. पल्लवी संजय अल्हाट
अहिल्यानगर

