“आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करणे काळाची गरज”

0
85

लेखक अमित्र ओळंबे

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील “रामसर’ येथे पाणथळ प्रदेशाचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये २ फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो..पाणथळ प्रदेशांच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन व शाश्वत व्यवस्थापनासाठी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

निसर्गात अतिशय वैविध्यपूर्ण जागा आहेत. जसे त्यात डोंगर, दऱ्या, नद्या , तलाव , सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेक विविध प्रकारच्या गवतांनी आणि झाडे -झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला बहुतांश ठिकाणी आढळतात त्याला आपण दलदल म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये त्यांना वेटलॅन्ड्स असे म्हटले जाते…पाणथळ प्रदेशांमध्ये पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, मोठी श्वापदे तसेच मत्सशेती तलाव, शेततळी अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. पाणथळ प्रदेश स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्वाचे स्थान असते त्यामुळे पाणथळ प्रदेशांचे संवर्धन पक्षी जगत वाचवण्यासाठी आणि जैवविविधता जपण्यासाठी महत्वाचे आहे.

जागतिक स्थरावर हा दिवस साजरा करत असताना दरवर्षी एक थीम निवडली जाते या वर्षी देखील एक थीम निवडण्यात आली आहे आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करणे (“Protecting Wetlands for Our Common Future”) अशी या वर्षीच्या या दिवसाची थीम आहे. बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. ‘प्लवर’ सारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी (इबिस), चमचा, रोहित (फ्लेमिंगो) हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरिया सारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा असतात.पर्यावरणासाठी त्याच्या संतुलनासाठी पाणथळ जागांचे महत्व मोठे आहे. वस्तूत: पाणथळ जागा या जमीन आणि पाणी यांचे समन्वय साधणाऱ्या असतात. केवळ पशुपक्षी नव्हे तर विविध लव्हाळी, हवा/ऑक्स‍िजन याच्या पोकळ्या असणाऱ्या वनस्पती, त्यांच्या आधाराने राहणारे सजीव आणि डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव, एकपेशीय जीव यांनी पाणथळ जागा समृद्ध असतात. बहुतांश खाड्यांमध्ये विविध खारफुटी वनस्पती असतात.

अभ्यासक आणि पर्यटक या दोहोंसाठी पाणथळ जागा महत्वाच्या आहेत. इथल्या जैवविविधतेमुळे त्या ठराविक घटकांचा, सजीवांचा अभ्यास, तर होतोच, शिवाय त्यांच्या परस्परांमधल्या संबंधाचा सुद्धा अभ्यास करता येतो. येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे रोजगारी निर्मितीच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होतात. एका अर्थाने पर्यावरणासोबतच आर्थिक अंगाने सुद्धा पाणथळ जागांचे महत्व मोठे आहे. सजीव आणि निर्जीव अशा अनेक घटकांची मिळून एक समृद्ध परिसंस्था पाणथळ जागांमध्ये नांदत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here