कोल्हापूर प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
कोल्हापूर : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त कोल्हापुरातील उजळाईवाडी येथे पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या एका कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पार्टीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत शंभरहून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली असून या कारवाईत मद्यसाठ्यासह एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील उजळाईवाडी परिसरातील माया नावाच्या कॅफेमध्ये क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेकायदेशीरपणे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या. कॅफेमध्ये सुरू असलेल्या कर्णकर्कश आवाजात मद्यपान करत तरुणाई थिरकत होती. तर यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत होता.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना समजली आणि त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून या पार्टीवर छापा टाकला. या पार्टीमध्ये ६० पुरुष आणि ४०हून अधिक महिलांचा सहभाग असल्याचे पोलिसांना दिसून आलेलं आहे. या प्रकरणी कॅफे ‘माया’चा मालक दयानंद जयंत साळुंखे, पार्टी आयोजक मयुरा राजकुमार चुटानी, डीजे ऑपरेटर गणेश लहू खरात, मालक दिगंबर रघुनाथ सुतार यांच्यासह कामगारांवर पोलिसांनी कारवाई करत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कॅफेमधून ५३ हजार ७२५ रुपये किमतीचा विदेशी मध्य, ८८ हजार ७४० रुपये रोख रक्कम व एक लाख ४० हजार रुपये किमतीचा डीजे सिस्टीम असे एकूण ३ लाख ८२ हजार ४६५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहा. फौजदार हरीश पाटील, खंडेराव कोळी, पो. हे कॉ. विलास किरोळकर, अमित सरजे, सचिन पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, प्रवीण पाटील, अमर अडूर्कर, सतीश पोवार, रणजित कांबळे, समीर कांबळे, सोम राज पाटील यांनी केली आहे.

