बांधून गळ्यात घुंगरू
आज डौलाने चाले
आला बैलपोळा सण
मन आनंदाने डोले।।१।।
जोडी बघा कशी शोभते
ढवळ्या आणि पवळ्याची
करु मानाचा त्यास मुजरा
शोभा वाढवते मळ्याची।।२।।
बांधून बाशिंगे ही कपाळी
कसा शोभतो सर्जा- राजा
सर्जा राजाशिवाय नाही
आपल्या शेतामध्ये मजा।।३।।
लेवून मखमली झुली
चाले डौलात खिल्लारी
जसा अवतरला तो देवच
शिव माझा असे मल्हारी।।४।।
वाजत गाजत निघाली
सर्जा -राजाची हो वरात
बैलपोळ्याचा हा सण
चला स्वागत करू दारात।।५।।
आज सर्व बैलांचा खरच
एकच दिवस असे आनंदी
पुरणपोळी खाऊ सगळे
मस्त फिरतात स्वच्छंदी।।६।।
बैलपोळ्याच्या या सणाला
आज आली सुखाची भरती
अखंडपणे गाजत राहो माझ्या
अनमोल सर्जा राजाची कीर्ती।७।
कवियत्री- प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

