आता आयुष्याचा उद्देश म्हणजे नेमके काय. आपण लहान असतो तेव्हा पूर्णपणे आपण पालकांवर अवलंबून असतो. आपला स्वत:चा काही असा उद्देश नसतो. आईवडील जे करतील तेच आपल्यासाठी संपूर्ण असते. पण जसे जसे मोठे होत जातो आपल्या आयुष्यात लहान लहान उद्देशांच्या पायऱ्या आपण चढत जातो. उद्या काय करायचे आहे हे जवळजवळ निर्धारित असते, अभ्यासात उत्तम असलो तर मार्ग मिळत जातो आणि आपण तसे घडत जातो. अभ्यासात भोपळा असलो तर मग तसे मार्ग आपण काढतो पण जगणे सोडत नाही. लग्न झाले तर मग जोडीदाराशी जुळवून घेण्यात, नाती जपण्यात आयुष्याचा काळ धावत असतो. मग मुलाचं करण्यात आपल्याला आपला जीवनाचा उद्देश दिसतो. तारेवरची कसरत असते आई वडीलांची. आई सकाळ पासून तर रात्रीपर्यंत घडीच्या काट्यांवर धावत असते तर पिताही मुलांच्या भविष्यासाठी तेवढाच तत्पर असतो. तरीही ते दिवस आयुष्याचे सोनेरी दिवस असतात कारण चंदेरी केसांची चाहुल नसते.
मुलं मोठी झाली कि मग त्यांच्या कॅरिअर मध्ये व्यस्त होतात. हळू-हळू आईवडीलांची जागा जोडीदार घेतो आणि आई वडील परत मुलांमध्ये स्वत:ला बघत व्यस्त होता. अश्यातच मग चंदेरी केसांची चाहुल लागते आणि कधी वयाची पन्नासावी येवून ठेवते कळत नाही. हल्ली तर पंचवीस तिशीत चांदीचे केस दिसतात पण खरी चाहुल तर त्याच वयात असते. असो!!!
आता आधी सारखे चाळिशीच्या उंबरठ्यावर असे काही नाही बरं का, कारण आजकाल लग्नच मुळी तीस पस्तीस वर्षात होते मग मांडा गणित! सगळा संसाराचा गाडा ओढता ओढता होतोच पन्नास पंचावण वर्षाचे. बघता बघता मग साठावी लागते, ह्यातही काही जवळचे दूरचे गळायला लागतात. मग ओढाताण सुरू होते ती आरोग्याची…
किती हा प्रवास… ह्यात कुठे आपल्याला आपल्या साठी वेळ मिळतो… आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा काहीच नाही आपल्याकडे करायला हे उगाच मानत येत असते… आणि ह्याच विचारात आयुष्यात खूप काही करायचे राहून गेले ह्या भावनेत मृत्यूचे आमंत्रण आपण स्वीकारायला तयार असतो…
कदाचित जगता जगता आयुष्य आपले आपण आपल्याला शोधणे विसरून जातो आणि मग जगण्याचा उद्देश गवसणे कठीण होते…
आपण आयुष्यात अनेक स्वप्न बघतो पण तेच स्वप्न जाण्याची कला गवसणे म्हणजे आयुष्याचा उद्देश हो…
आता जास्त दिवस जगणारे करतात तरी असे काय असा विचार मनात आला असेल ना…
अहो त्यांच्या कडे जाण्याचा उद्देश असतो, तो पूर्ण करण्यासाठी ते जगतात, मनातून जगतात आणि आयुष्य परिपूर्ण जगतात…
आता तो उद्देश शोधायचा कसा हा प्रश्न पडला ना….
यामामोतो सानला मी सतारा वर्षाआधी भेटले होते. यामामोतो तिचे नाव, आता सान म्हणजे सरनेम नाही, तर श्रीमान/श्रीमती असा अर्थ होतो.
जपानला नावामागे सान हा शब्द लावतात, आता इथे स्त्री पुरुष असा भेद नाही बरका… स्त्री किंवा पुरुष एखाद्याला संबोधतांना ते सान हा शब्द लावतात. अर्थात त्यांना मान देवून बोलल्या जाते उलट ह्यात लहान मोठं असं काही नाही. फक्त लहान मुलं सोडली की सगळे ह्या सान शब्दाच्या जाळ्यात आले. ह्या सानच्या घोटाळ्यात मला तर त्या व्यक्तीला परस्पर भेटल्या शिवाय समजाचे नाही कि ती व्यक्ती पुरुष आणि कि स्त्री, म्हणजे अजूनही समजत नाही. पण चालायचं…
To be continues…
लेखिका – उर्मिला देवेन
जपान

