श्रावणातली सांज ढगांचा साज लेवुनी आज रंगते आहे
हलकेच वाजते झांझ सरीची आज पावशी राज्य सांगते आहे
या पावसात रानात कुण्या धुंदीत मोर रंगात नाचतो आहे
मातीत माखले हात बळीचे गात गीत शेतात राबतो आहे
मातीस गंधही खास हवासा श्वास भास वाऱ्यास थांबल्या धारा
आभाळ ना निळेशार कसा अंधार मेघ मल्हार गातसे वारा
झाडेच डोलती फार फुलांना भार घालती हार भक्तगण देवा
वाऱ्यास लागला छंद कुणाचा धुंद वाहतो मंद वाजतो पावा
पाहून सावळे मेघ सरीना वेग पेटली आग सांडले अत्तर
प्राशून थेंब ते बिंब धरेचे चिंब काय प्रतिबिंब देखणे सुंदर
नटली वसुंधरा गंध फुलांना धुंद बावरा रंग साजरा हिरवा
सुंदर किती सृजन भेट धरेचा थाट पाचवा घाट हा ऋतू बरवा
कवयित्री सौ. गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

